
तिरुपती : चेन्नई येथील एका जैन दांपत्याने गुरुवारी तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात १२१ किलो सोन्याचे दागिने दान केले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत ही भेट अर्पण करण्यात आली. या दागिन्यांचे एकूण मूल्य २०६ कोटी रुपये इतके असल्याचे सांगितले जात आहे. वर्धमान जैन आणि त्यांच्या पत्नी राधिका जैन यांनी एकूण ४६ प्रकारचे सोन्याचे दागिने अर्पण केले. यापैकी १०६ किलो वजनाचे दागिने भगवान व्यंकटेश्वरांसाठी, तर १५ किलो वजनाचे एक विशेष सोन्याचे वस्त्र देवी पद्मावती यांच्यासाठी देण्यात आले.

तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या पुजाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी मंदिराच्या वतीने ही भेट स्वीकारली. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, तिरुमला मंदिराला एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. दान केलेल्या वस्तूंमध्ये नीलम, पुखराज, माणिक आणि पाचू जडवलेले 'श्रीवत्सम' पदक समाविष्ट आहे. इतर दागिन्यांमध्येही हिरे जडवलेले आहेत.
या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री नायडू यांनी त्या दांपत्याचे आभार मानले आणि या घटनेला पवित्र मंदिराच्या इतिहासातील एक दुर्मिळ व उल्लेखनीय प्रसंग असे संबोधले. नायडू यांनी सांगितले की, भगवान व्यंकटेश्वराच्या दैवी कृपेने प्रेरित होऊन आपण हे दान केल्याचे त्या दांपत्याने त्यांना सांगितले. त्यांनी नमूद केले की, या दागिन्यांमध्ये सोन्यासोबत मौल्यवान हिऱ्यांचे जडावकाम केलेले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








