
सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत भटकंती करत असलेल्या 'ओंकार' हत्तीची अखेर आपल्या मूळ कळपाशी भेट झाली आहे. बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील जंगलात ही भेट घडून आली असून या घटनेला उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून आपल्या कळपापासून विभक्त झालेला 'ओंकार' हत्ती सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवरील गावांमध्ये मुक्तपणे संचार करत होता. त्याच्या या भटकंतीमुळे दोन्ही राज्यांतील वन विभागाचे पथक त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून होते.
त्याच्यासोबत खास टीमही तैनात होती. मात्र, शेतकऱ्यांच होणार नुकसान अन् ओंकारची गावोगावी भटकंती यावरून स्थानिकांत वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले होते.
अखेर बुधवारी कोलझर येथील घनदाट जंगलात 'ओंकार' आणि त्याचा कळप एकत्र आला. वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ओंकार कुटुंबात परतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वन कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कळपात परतल्यामुळे आता ओंकारचा नैसर्गिक अधिवासातील वावर अधिक सुरक्षित आणि स्थिर होईल, असा विश्वास वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे. तसेच ओंकार कुटुंबासह रमतो की पुन्हा वेगळी वाट स्वीकारतो ? याकडे ही लक्ष लागून राहिले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








