
मुंबई : महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागांत कार्तिक पौर्णिमेला एक अनोखा उत्सव सुरू होतो. या दिवसाला आपण 'त्रिपुरी पौर्णिमा' किंवा 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हणतो. पण जरा थांबून विचार करा एकीकडे 'त्रिपुरासुराचा वध' करणारी पौराणिक कथा, दुसरीकडे 'दीपदानाचा' आध्यात्मिक सोहळा, आणि तिसरीकडे गावागावात सुरू होणाऱ्या 'जत्रांचा' सुकाळ. या तिन्ही गोष्टींचा परस्परसंबंध काय आहे? या पौर्णिमेला 'त्रिपुरारी' का म्हणतात, आणि नेमक्या याच दिवशी बहुतांशी जत्रांचा प्रारंभ का होतो? हे जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, तारकाक्षाचा मुलगा 'त्रिपुरासुर' यांनी तिन्ही लोकांत हाहाकार माजवला होता. अहंकार, अनीति आणि अधर्माचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या 'त्रिपुराचा' संहार भगवान शिवाने कार्तिक पौर्णिमेला केला, म्हणून शिवाला 'त्रिपुरारी' असे नाव मिळाले. यावरून या पौर्णिमेला 'त्रिपुरारी पौर्णिमा' म्हटले जाते. काही अभ्यासकांच्या मते, कार्तिक पौर्णिमेला 'त्रिपुर' लावण्याची किंवा 'त्रिपुर' नावाच्या उत्सवाची परंपरा या नावाशी जोडली गेली असावी.
कार्तिक पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजाने चमकतो; रात्रीचा अंधार कमी होऊन चांदण्याचा प्रकाश पसरतो. पूर्वी कृत्रिम दिव्यांची सोय मर्यादित असताना पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आणि दीपमाळांचा उजेड रात्रीच्या उत्सवांना पूरक ठरत असे. कोकण आणि गोव्याच्या लोकसंस्कृतीत भूमी, निसर्ग आणि ग्रामरक्षणाशी जोडलेली सातेरी ही महत्त्वाची मातृदेवता असून, बहुतांशी सातेरी देवस्थानांच्या जत्रा त्रिपुरारी पौर्णिमेला होण्यामागे निसर्गचक्र, कृषी-अर्थकारण आणि लोकपरंपरेचा सुंदर संगम आहे.
पावसाळ्यातील चातुर्मास संपून हवामान कोरडे व प्रवासास अनुकूल झालेले असते, तर दुसरीकडे खरीप पिकांची कापणी व मळणी पूर्ण होऊन नवा माल हाती आल्याने गावात आर्थिक सुबत्ता आणि उत्सवाचा उत्साह संचारलेला असतो. ज्या भूमीने व निसर्गाने पीक दिले, त्या प्रकृतीरूपाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, दीपमाळांच्या प्रकाशातून अरिष्टांवर व अंधारावर विजयाची प्रार्थना करण्याचा आणि बाहेरगावी गेलेल्या मानकऱ्यांना व ग्रामस्थांना एकत्र आणून सामाजिक एकोपा जपण्याचा हा काळ ठरतो; त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेची सातेरीची जत्रा ही केवळ धार्मिक प्रथा न राहता निसर्ग, शेती आणि समाजजीवनाचा जिवंत उत्सव बनून समोर येते.
संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








