LIVE UPDATES

‘E = F’ हे समीकरण न्यूटन आणि आइन्स्टाईन यांच्या समीकरणांपेक्षाही मोठे

पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन : नाईक-मराठा मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा दिमाखदार सांगता समारंभ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 07:32 PM
views 21  views
Dr Raghunath Mashelkar addressing the Naik Maratha Mandal centenary celebration in Mumbai.

मुंबई : “तुमचा जन्म कधी झाला आणि कोणाच्या घरी झाला, यापेक्षा तुम्ही तुमचे भविष्य कसे घडवता, हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे. गरिबीमुळे संधी कमी मिळू शकतात; मात्र क्षमता कधीच गरीब नसते. ती क्षमता फुलवण्यासाठी योग्य वेळी मिळालेला आधार निर्णायक ठरतो. म्हणूनच माझ्या मते E = F E म्हणजे (एज्युकेशन (शिक्षण) आणि F म्हणजे फ्युचर) हे समीकरण न्यूटन आणि आइन्स्टाईन यांच्या समीकरणांपेक्षाही मोठे आहे.” असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

नाईक-मराठा मंडळ, मुंबईच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दादर येथील प्राध्यापक बी. एन. वैद्य सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून शरद विठ्ठल वेंगुर्लेकर, मंडळाच्या अध्यक्ष व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गडकर, सुनील सांगेलकर आणि ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक उपस्थित होते. कार्यक्रमात शताब्दी स्मृतिग्रंथाचे प्रकाशन, गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्ती वितरण तसेच विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

यावेळी गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर स्मृती साहित्यिक, शैक्षणिक व वैज्ञानिक प्रथम पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना, स्व. किशोर गोविंदराव सातोसकर स्मृती समाजभूषण प्रथम पुरस्कार हेमंत मोहन अणावकर यांना, स्व. महादेव मनोहर नाईक स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार किशोर दत्ताराम नांदोसकर यांना, तर सरस्वती पूजा शिष्यवृत्ती सोनम तुषार काळसेकर हिला प्रदान करण्यात आला.

पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. माशेलकर म्हणाले की, मंडळाने प्रदान केलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. एखाद्या पुरस्काराचे मोठेपण त्यामागील विचारांमुळे वाढते. या पुरस्कारामागे शिक्षणाची तळमळ, समाजपरिवर्तनाचे ध्येय आणि वंचितांच्या आयुष्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याची भावना आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे.

एखादी संस्था शंभर वर्षे चालवणे ही मोठी गोष्ट आहे; मात्र शंभर वर्षे समाजाच्या वेदनांशी आपले नाते जिवंत ठेवणे ही त्याहून मोठी गोष्ट आहे. काळानुसार पिढ्या, कार्यकर्ते आणि समाजाच्या गरजा बदलत असतात. तरीही संस्थेची परिवर्तनाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी निष्ठा, त्याग आणि सातत्य आवश्यक असते. यामध्ये कार्यकर्ते आणि संस्थेला मदत करणाऱ्या दात्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सन १९२६ मध्ये गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी संस्थेची स्थापना केली, तेव्हा समाजासमोर अज्ञान, अन्याय आणि अनिष्ट प्रथांचे मोठे आव्हान होते. देवदासी प्रथा, बालविवाह आणि हुंडाबळी यांसारख्या प्रथांविरोधात उभे राहणे म्हणजे प्रस्थापित समजुतींना आव्हान देणे होते. गुरुवर्य केळुसकर यांनी लेखणीच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष कृतीतून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, मदत आणि आधार देत शिक्षणाची दारे खुली करण्याचे महत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिले, असे माशेलकर यांनी सांगितले.

आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, “माझी आई शिकलेली नव्हती; मात्र तिची जिद्द मोठी होती. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो. महानगरपालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. मला मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या आधारावर पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे आज जेव्हा गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, तेव्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये मला माझे बालपण दिसते आणि त्यांच्या भविष्याची काळजी करणाऱ्या आईमध्ये मला माझ्या आईचा चेहरा दिसतो.”

नाईक-मराठा मंडळाने शैक्षणिक योजनांसाठी आतापर्यंत ८५ लाख रुपये खर्च केल्याचा उल्लेख करत त्यांनी मंडळाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या रकमेचे खरे मूल्य त्यातून शिक्षण घेऊन घडलेल्या डॉक्टर, अभियंते, वकील, शिक्षक आणि कलाकारांच्या कार्यातून समाजाला पुन्हा पुन्हा मिळत असते. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सरस्वती पूजा योजनेतून पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी, निराधार महिलांना सहाय्य आणि रुग्णांना वैद्यकीय मदत अशा उपक्रमांतून माणसांना सन्मानाने उभे करण्याची भावना दिसून येते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यापुढील काळातील मंडळाच्या कार्यासाठी तीन महत्त्वाची स्वप्नेही त्यांनी मांडली. आर्थिक अडचणीमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हे पहिले स्वप्न असल्याचे सांगताना ते म्हणाले की, मदतीसाठी विद्यार्थ्याने स्वतःहून येण्याची वाट न पाहता गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली पाहिजे. कारण गरिबीला संकोचाचीही साथ असते.

प्रत्येक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक मिळावा, हे त्यांचे दुसरे स्वप्न आहे. प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाची निवड, मुलाखतीची तयारी आणि अपयशातून सावरणे यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. तर तिसऱ्या स्वप्नाविषयी बोलताना त्यांनी डिजिटल कौशल्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, संवादकौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यावर भर दिला.

गुरुवर्य केळुसकर यांच्या परिवर्तनाच्या वारशाला पुढे नेण्यासाठी नव्या काळातील ज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना संदेश देताना डॉ. माशेलकर म्हणाले, “तुम्हाला मिळालेली मदत कृतज्ञतेने स्वीकारा, खूप शिका, मोठी स्वप्ने पाहा. उद्या स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याला मदतीचा हात द्या. अशा प्रकारे कृतज्ञतेची साखळी निर्माण होईल आणि मंडळाच्या कार्याची व्याप्ती पिढ्यान्‌पिढ्या वाढत राहील.”