
देवगड : महाराष्ट्रातील ग्रामीण सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांचे दस्तऐवजीकरण करून त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘पंचायत धरोहर उपक्रमासाठी’ (Panchayat Dharohar Initiative) महाराष्ट्राच्या राज्य नोडल अधिकारी म्हणून शिवराज राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, जिल्हा परिषद सोलापूर येथे कार्यरत असलेले एमटी तथा ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, शिवराज राठोड यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे आणि किंजवडे ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय कामकाजासह ग्रामपंचायत स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये योगदान दिले. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली होती. आता त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्राच्या राज्य नोडल अधिकारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा प्रशासकीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.
‘पंचायत धरोहर’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील बांधकाम वारसा स्थळे (Built Heritage Sites), प्रेक्षणीय स्थळे (Places of Interest) आणि ग्रामीण भागातील सांस्कृतिक वारशाचे संकलन व दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या वारसास्थळांची माहिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि छायाचित्रांचा समावेश असलेली जिल्हावार सचित्र पुस्तके प्रकाशित करण्याचे नियोजन आहे. यामुळे ग्रामीण भागातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा व्यापक स्तरावर समोर येण्यास मदत होणार आहे.
यासंदर्भात पंचायती राज मंत्रालय, भारत सरकारचे सहसचिव राजेश कुमार सिंह यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या अर्धशासकीय पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने ही नियुक्ती केली आहे. विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे. राज्यातील या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समन्वय साधण्यासह जिल्हावार वारसा पुस्तकांचे संकलन आणि प्रकाशन प्रक्रियेत राठोड यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे.
महाराष्ट्रातील गावागावांत विखुरलेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा, मंदिर स्थापत्य, प्राचीन वास्तू, पारंपरिक स्थळे तसेच स्थानिक कला-संस्कृती यांना या उपक्रमामुळे स्वतंत्र ओळख मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण वारशाचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण होऊन तो पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे आणि किंजवडे ग्रामपंचायतींमध्ये काम करताना आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शिवराज राठोड यांची महाराष्ट्राच्या राज्य नोडल अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिंधुदुर्गातील त्यांचे मित्रपरिवार, सहकारी आणि परिचितांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्ह्यात काम केलेल्या अधिकाऱ्याला राज्यस्तरावरील महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने सिंधुदुर्गवासीयांसाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








