
सिंधुदुर्गनगरी : रेडी येथील जंगलमय परिसरात आढळलेल्या अनोळखी मृतदेहाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यापर्यंत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे प्रवासाची माहिती, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर केला.
दरम्यान, या खून प्रकरणात मृताचे दोन मुलगे सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, मोठ्या मुलाला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा अल्पवयीन भाऊही गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. वडील सतत दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत तसेच मारहाण करत असल्याने कंटाळून दोघांनी संगनमताने त्यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
दाऊद मुसाफीर शेख (वय ५६, मूळ रा. पूर्व चंपारण, बिहार) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी संशयित नजरे दाऊद आलम (वय ३१) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्याच्या अल्पवयीन भावाला विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
जंगलात आढळला अनोळखी मृतदेह
वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेडी येथील जंगलमय परिसरात १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संशयास्पद स्थितीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आणि मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही फुटेज तपासणी, तांत्रिक विश्लेषण, रेल्वेकडून माहिती संकलन आणि स्थानिक पातळीवरील चौकशी अशा विविध मार्गांनी तपास सुरू करण्यात आला.
आकस्मिक मृत्यूचा तपास खुनापर्यंत पोहोचला
तपासादरम्यान मृत्यू हा नैसर्गिक अथवा आकस्मिक नसून खून असल्याचे स्पष्ट होत गेले. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व २३८ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिक तीव्र करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, रेल्वे प्रशासनाकडून मिळालेली माहिती, मृताच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि मानवी माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. मृत हा दाऊद शेख असून तो बिहार राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
रेल्वे प्रवास आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपींपर्यंत धागे
मृताच्या प्रवासाची माहिती, रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. त्याच्या नातेवाईकांची माहिती मिळवून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे मृताच्या मुलांवर संशय केंद्रित झाला.
या तपासातून नजरे दाऊद आलम आणि त्याचा अल्पवयीन भाऊ, दोघेही मूळ वृंदावन टोला, नरदरवा, सितालपूर, पूर्व चंपारण, बिहार येथील रहिवासी असून सध्या आरोंदा, रेडकरवाडी, ता. सावंतवाडी येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले.
वडिलांच्या त्रासाला कंटाळून खून केल्याची कबुली
पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी पहाटे आरोंदा येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मृत दाऊद मुसाफीर शेख हे आपले वडील असल्याचे आरोपींनी सांगितले. वडील सतत दारू पिऊन कुटुंबाला त्रास देत आणि मारहाण करत असल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून दोघांनी संगनमत केले. त्यानंतर वडिलांचा खून करून मृतदेह लपविण्याच्या उद्देशाने रेडी येथील जंगलमय भागात नेऊन टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.
खुनानंतर मृतदेह जंगलात टाकून आरोपींनी गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी विविध तपास पद्धतींचा वापर करत अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उल्लेखनीय कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण (जिल्हा विशेष शाखा) यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास केला.
या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सुधीर सावंत तसेच राजेंद्र जामसंडेकर, सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, सुरेश राठोड, प्रकाश कदम, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्साल्विस, अविनाश ओटवणेकर, अमर कांडर, महेश्वर समजिसकर आदी पोलीस अंमलदार सहभागी होते.
सायबर पोलीस ठाण्याचे फ्रिडम बुथेलो व धनश्री परब, एटीबीचे योगेश साटम आणि सावंतवाडी एसडीपीओ कार्यालयातील सिद्धार्थ प्रभूतेंडोलकर तसेच सीसीटीएनएसचे ऋषिकेश टोपले यांनीही तपासात सहकार्य केले. गुंतागुंतीच्या खुनाच्या गुन्ह्याचा तांत्रिक व मानवी कौशल्याच्या आधारे उलगडा करून आरोपींना निष्पन्न केल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








