
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद सभागृहात शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा ठराव झालेला असताना जिल्ह्यातील आठ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आल्याचा मुद्दा सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत चांगलाच तापला. सभागृहाच्या निर्णयाला डावलून शिक्षण विभागाने परस्पर कार्यवाही केल्याचा आरोप करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शिक्षकांचे राजीनामे मंजूर करण्याऐवजी त्यांना कार्यमुक्त का करण्यात आले? जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून शिक्षकांना सेवाजोड देण्याचा शिक्षण विभागाचा अट्टहास कशासाठी? असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘सभागृहाच्या ठरावालाच किंमत नसेल, तर आम्ही सभेला यायचे कशाला?’ असा संतप्त सवालही यावेळी करण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा सोमवारी (२३ नोव्हेंबर) अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. या सभेत शिक्षकांच्या कार्यमुक्तीचा विषय उपस्थित होताच सदस्य संदीप गावडे, मनोज रावराणे, संदेश सावंत, रुपेश कानडे आणि सुमेधा पाताडे यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नांची सरबत्ती केली.
संबंधित आठ शिक्षकांची त्यांच्या जिल्ह्यात भरती झाल्याने त्यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये राजीनामे देऊन सिंधुदुर्ग जिल्हा सोडल्याची माहिती सभेत पुढे आली. या शिक्षकांचे राजीनामे कार्यालयात कधी प्राप्त झाले, त्यावर मंजुरी अथवा नामंजुरीबाबत काय कार्यवाही झाली, याची माहिती सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागितली. मात्र, संबंधित शिक्षकांचे राजीनामे आपल्याकडे प्राप्त झाले नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
राजीनामे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजीनामे संबंधित कार्यालयाकडे प्राप्त झाले असताना ते मंजूर का करण्यात आले नाहीत आणि शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही नेमकी कशी झाली, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.
अध्यक्षांनाही अंधारात ठेवल्याचा मुद्दा
या प्रकरणात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती, असे स्पष्ट केले. अध्यक्षांनाच या कार्यवाहीची कल्पना नसल्याचे समोर आल्याने शिक्षण विभागाच्या निर्णयप्रक्रियेवर आणि प्रशासकीय समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सभागृहाचा ठराव असताना त्याची अंमलबजावणी न करता शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास सदस्यांनी सभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रशासन किती गांभीर्याने घेते, असा सवाल उपस्थित झाला.
दरम्यान, एकदा भरती होऊन शिक्षक म्हणून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पुन्हा पवित्र पोर्टलवर अर्ज करण्याची मुभा देण्यात येऊ नये, असा ठराव सदस्य सुमेधा पाताडे यांनी मांडला. हा ठराव शासनाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अशा निर्णयांबाबत स्पष्ट धोरण असावे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली.
शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी; शिक्षण आयुक्तांकडे तक्रारीचा इशारा
शिक्षण विभागातील कारभारावर चर्चा सुरू असताना सदस्य संदीप गावडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याची सूचना केली. स्वतःच्या मर्जीनुसार काम करण्याऐवजी नियम आणि सभागृहाच्या निर्णयांचा आदर राखावा, अन्यथा शिक्षण आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला. शिक्षकांच्या कार्यमुक्तीच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि सदस्यांमधील नाराजी सभेत स्पष्टपणे दिसून आली.
२८ सीएचओच्या बदल्यांची फाईल रोखा; एकालाही कार्यमुक्त करू नका
शिक्षकांच्या कार्यमुक्तीवरून वातावरण तापले असतानाच आरोग्य विभागातील २८ समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांच्या बदल्यांचा विषयही सभेत पुढे आला. संबंधित बदल्यांची फाईल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती सभेत देण्यात आली. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ही फाईल तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले.
‘एकाही समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला कार्यमुक्त करू नका,’ असे स्पष्ट आदेश अध्यक्षांनी दिल्याने आरोग्य विभागातील संभाव्य कार्यमुक्तीच्या प्रक्रियेलाही स्थायी समितीने विरोध दर्शविला.
शिक्षकांच्या कार्यमुक्तीवरून सुरू झालेल्या या चर्चेत सभागृहाचा ठराव, प्रशासनाची कार्यपद्धती आणि सदस्यांना विश्वासात घेण्याचा मुद्दा ऐरणीवर आला. शिक्षण विभागाच्या निर्णयांबाबत सदस्यांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता, या प्रकरणाचे पडसाद जिल्हा परिषदेत पुढील काळातही उमटण्याची शक्यता आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








