LIVE UPDATES

Sindhudurg News : जिल्हा परिषद स्थायी समितीत प्रशासनावर सदस्यांचा संताप

अंगणवाडींच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तीन कोटींचा खर्च निष्फळ? : ३९९ अंगणवाड्यांतील यंत्रणा बसविल्याचा अहवाल, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम अपूर्ण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 23, 2026 07:54 PM
views 18  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा प्रत्यक्षात बसविण्यात न आल्याचा प्रकार, ११२ भजनी मंडळांना मंजूर भजन साहित्य अद्याप न मिळणे आणि उभादांडा हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण अशा विविध मुद्द्यांवर सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत प्रशासनाला सदस्यांच्या आक्रमक प्रश्नांना सामोरे जावे लागले. कामे पूर्ण झाल्याचे अहवाल दिले जातात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते, यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा वचक असला पाहिजे, तो वचक आपण ठेवावा; आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास सदस्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना दिला.

जिल्हा परिषद स्थायी समिती सभा अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात झाली. यावेळी उपाध्यक्ष दादा साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष सटविलकर, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प अधिकारी उदय पाटील, समिती सदस्य मनोज रावराणे, नागेश आईर, संदेश उर्फ गोट्या सावंत, संदीप गावडे, रुपेश कानडे, सुमेधा पाताडे, सुप्रिया वालावलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तीन कोटींचा खर्च, पण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपयोग कुठे?

जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम पुरविण्यात आली असून, प्रत्येक यंत्रणेची किंमत सुमारे ९४ हजार रुपये आहे. मात्र, अनेक अंगणवाड्यांमध्ये या यंत्रणा बसविण्यात आलेल्या नाहीत. काही ठिकाणी त्या बसविल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी साहित्य पडून असल्याची वस्तुस्थिती आहे. असे असताना सर्व अंगणवाड्यांमध्ये यंत्रणा बसविल्याचा अहवाल प्रशासनाकडून देण्यात आला आणि संबंधित पुरवठादाराचे बिलही अदा करण्यात आले.

हा गंभीर प्रकार सदस्य मनोज रावराणे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. या कामासाठी सुमारे ३ कोटी ६७ लाख रुपये खर्च करण्यात आला असून, प्रत्यक्षात यंत्रणा कार्यान्वित नसल्याने या खर्चाचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला. काम पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

या विषयावर प्रशासनाकडे ठोस उत्तर नसल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस वगळता इतर संबंधितांवर कारवाई करण्याबाबत महिला व बालविकास सभापतींना सूचना दिल्या.

११२ भजनी मंडळांना साहित्य नाही; सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर

जिल्ह्यातील १५० भजनी मंडळांना २०२५ मध्ये जिल्हा परिषद स्वनिधीतून भजन साहित्य देण्याचे निश्चित करण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावांनुसार या मंडळांना साहित्य खरेदीसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात केवळ ३८ भजनी मंडळांनाच साहित्य मिळाले असून, उर्वरित ११२ मंडळे अद्याप साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत.

हा विषय सभागृहात उपस्थित होताच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. भजनी मंडळांना ज्या वेळी साहित्याची आवश्यकता होती, त्याच वेळी ते उपलब्ध करून देण्यात आले नाही. हा प्रश्न अनेक सभांमध्ये उपस्थित करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. हा प्रकार म्हणजे सदस्यांची थट्टा आहे का, असा संतप्त सवाल संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केला.

सदस्य रुपेश कानडे, संदीप गावडे, मनोज रावराणे यांच्यासह सर्वच सदस्यांनी या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली. अखेर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल तसेच दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर सभागृहातील वातावरण निवळले.

उभादांडा हायस्कूलचा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी

वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सभेत करण्यात आली.

संबंधित अतिक्रमणधारक न्यायालयात गेल्याने न्यायालयाने जैसे थे आदेश दिले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्यासाठी तीन नोटिसा बजावल्या असूनही कार्यवाही केलेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.

यावर सदस्यांनी जैसे थे आदेशाचा अर्थ नेमका काय लावला जात आहे, असा सवाल उपस्थित केला. जैसे थे म्हणजे पायवाट बंद करणे नव्हे, तर शाळेकडे जाणारा मार्ग सुरू राहिला पाहिजे, अशी भूमिका सर्व सदस्यांनी घेतली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा रस्ता सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

या सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाच्या कामकाजातील त्रुटींवर बोट ठेवत तीव्र नाराजी व्यक्त केली. मंजूर कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत का, निधी खर्च झाल्यानंतर त्याचा उपयोग जनतेला होतो आहे का, तसेच अधिकाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवली जाते का, असे प्रश्न उपस्थित झाले. प्रशासनाच्या कामकाजावर पदाधिकाऱ्यांचा प्रभावी वचक राहिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत सदस्यांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.

सभापतींना सदस्यांचा ‘घरचा आहेर’!

स्थायी समिती सभेत जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा सुरू असताना सदस्य संदीप गावडे यांनी ‘एवढे सगळे विषय आपल्या जिल्ह्यातच कसे होतात?’ असा सवाल उपस्थित केला. त्यावर वित्त व बांधकाम सभापती संतोष सटविलकर यांनी ‘चला, चला पुढे चला’ असे म्हणत विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे सदस्य सुमेधा पाताडे संतप्त झाल्या.

‘तुम्ही सगळे विषय सहजतेने घेता, हे योग्य नाही. प्रत्येक वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करता, हे चुकीचे आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सभापतींना सुनावले. प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला. सभापतींनाच सभागृहात मिळालेल्या या घरच्या आहेराची चांगलीच चर्चा रंगली.


ताजी बातमी

View all

२२ तलाव, धरणांच्या गाळ उपशासाठी २.२० कोटींचा ठेका
November 23, 2026
पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट मार्गे कोल्हापूर-पुणे मार्गावर कदंबा बससेवा सुरू करा
November 23, 2026
देवगडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
November 23, 2026
Yuvraj Lakhamraje Bhosale addressing a press conference in Sawantwadi about the multispeciality hospital project and city development.
Sawantwadi Multispeciality Hospital : नगराध्यक्षा म्हणून श्रद्धाराजे सक्षम
November 23, 2026
संबंधित बातम्या

View all

२२ तलाव, धरणांच्या गाळ उपशासाठी २.२० कोटींचा ठेका
November 23, 2026
पणजी-दोडामार्ग-तिलारी घाट मार्गे कोल्हापूर-पुणे मार्गावर कदंबा बससेवा सुरू करा
November 23, 2026
देवगडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रथमच सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
November 23, 2026
Yuvraj Lakhamraje Bhosale addressing a press conference in Sawantwadi about the multispeciality hospital project and city development.
Sawantwadi Multispeciality Hospital : नगराध्यक्षा म्हणून श्रद्धाराजे सक्षम
November 23, 2026