
सिंधुदुर्गनगरी : कारागृहातील बंदीवानांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी मानव साधन विकास संस्था संचलित जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित पेंटिंग प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या ४० बंदीवानांना प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा कारागृह अधीक्षक कांबळे यांच्या विशेष पुढाकारातून बंदीवानांसाठी हे कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रमाणपत्र वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नादगल्ली उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश एस. एस. इंदलकर यांनी बंदीवानांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. बंदीवानांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सन्मानाने जगता यावे, यासाठी कारागृहात भविष्यातही अशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण राबविण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जन शिक्षण संस्थानचे संचालक सुधीर पालव यांनी बंदीवानांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्याची नवी दिशा मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी या कौशल्यामुळे उपलब्ध होऊ शकते. प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचा उपयोग करून पेंटिंग व्यवसाय सुरू करता येईल, तसेच विविध बँका आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळविण्याची संधीही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन शिक्षण संस्थानचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रमेश खरात यांनी केले. जिल्हा कारागृह अधीक्षक कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जन शिक्षण संस्थानच्या कार्यक्रम अधिकारी चैत्राली शिर्के, कारागृह प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी बंदीवान उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








