
मुंबई : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. या राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र आणि युवा नेते अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान सुनील तटकरे देखील उपस्थित होते. आगामी विधानपरिषद निवडणूक, महायुतीतील जागावाटप तसेच मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच सुरू आहे. अशा परिस्थितीत अनिकेत तटकरेंची शिंदेंशी झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भेटीनंतर अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना, “आगामी वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. जनसेवा, संघटन बळकटीकरण आणि विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला पात्र ठरत जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार केला आहे,” असे म्हटले.














