
सावंतवाडी : आपल्या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन नगरपरिषदांसाठी एकूण 12 कोटी रुपये मंजूर केले आहेत. श्री. केसरकर यांनी सावंतवाडी शहरासह मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. ते विकासपुरुष असून त्यांचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केले.सावंतवाडी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. परब बोलत होते.
यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, सेन्हा नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. यावेळी श्री परब म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दीपक केसरकर यांनी शहरातील पाणीटंचाईसाठी आम्हाला निधी मंजूर करुन दिला. त्याबद्दल आभार मानतो.
मोती तलावातील गाळ काढण्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी केली असून लवकरच आम्हाला तो निधी मंजूर होईल. तसेच सावंतवाडी शहरातील गवत मार्केटसाठी 9 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
वेंगुर्ला मच्छिमार्केट विस्तारीकरणासाठी 2 कोटी रुपये तर नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपये असे एकूण 12 कोटी सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन नगरपरिषदांसाठी आमदार केसरकर यांनी मंजूर करून आणले आहेत. तसेच शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई इमारत भाग 2 यासाठी आमदार केसरकर यांनी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
त्यांनी सावंतवाडी शहरासह मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. दीपक केसरकर हे विकासपुरुष असून त्यांचा मला अभिमान आहे असे श्री. परब म्हणाले.
श्री. परब पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदारांना अडीच कोटी रुपये दिले यातून आमदार केसरकर यांनी सावंतवाडी शहरातील महादेवाचे भाटले येथील नरेंद्र देशपांडे यांच्या घरानजीक गार्डनमध्ये सार्वजनिक विहीर नूतनीकरण करणे यासाठी 20 लाख रूपये, सावंतवाडी शहरातील सिधीवाडा येथे विहिरीची दुरुस्ती करणे यासाठी 5 लाख रुपये,
सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा डोंगरे पाणंद येथे सार्वजनिक विहीर बांधणे यासाठी 20 लाख रुपये, सावंतवाडी शहरातील झिरंग नाईक वाडा येथे विहिरीची दुरुस्ती करणे 5 लाख रुपये, सावंतवाडी शहरातील सालईवाडा सर्वोदय नगर येथील प्रणय नाईक यांच्या घरासमोरील खुल्या जागेत सार्वजनिक विहिरीचे बांधकाम करणे यासाठी 20 लाख रुपये, सावंतवाडी शहरातील झिरंग दत्तनगर येथील परेश बावकर यांच्या घराजवळील ओहोळावर बंधारा बांधणे यासाठी 10 लाख रुपये, सावंतवाडी शहरातील वेदिका आपार्टमेंट समोरील खुल्या जागेत सार्वजनिक विहिर बांधणे यासाठी 20 लाख रुपये तर सावंतवाडी शहरातील मोती तलावातील गाळ काढणे यासाठी दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती श्री परब यांनी दिली
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








