LIVE UPDATES

दहा दिवसांत दोडामार्ग-विजघर रस्त्याचे काम सुरू करा

अन्यथा ४ डिसेंबरपासून रास्ता रोको : तहसीलदारांना संदेश वाघो वरक यांचे निवेदन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 07:00 PM
views 25  views

दोडामार्ग : विजघर-तिलारी राज्यमार्गाच्या रखडलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संदेश वाघो वरक यांनी आक्रमक भूमिका घेत तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.

निवेदन प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा ४ डिसेंबरपासून रास्ता रोको किंवा तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, विजघर-तिलारी या राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले असून, पावसाळा संपून बराच कालावधी उलटला तरी कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मार्गावर खड्डे, उखडलेला रस्ता आणि असमतोल पृष्ठभाग निर्माण झाला आहे.

परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, कामगार, व्यापारी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. रस्त्याची दुरवस्था आणि ठिकठिकाणी केलेले अपूर्ण खोदकाम यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, या रखडलेल्या कामाला गती मिळावी यासाठी यापूर्वी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने प्रशासनाला लेखी आश्वासन देत काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, प्रशासनानेही या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८५ व १२५, मोटार वाहन अधिनियमातील कलम १९८ अ तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम १६३ यांचा संदर्भ देत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग करावे, दिशादर्शक व धोक्याचे इशारा फलक लावावेत आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांना स्पष्ट सूचना मिळण्यासाठी परावर्तित फलकांची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

संबंधित ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याचे निश्चित वेळापत्रक लेखी स्वरूपात घ्यावे, कामातील विलंबाची चौकशी करून ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी मागणी संदेश  वरक यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

आता आश्वासन नको, प्रत्यक्ष काम हवे!

दहा दिवसांच्या मुदतीत रस्त्याचे काम सुरू झाले नाही आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर ४ डिसेंबरपासून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने व आवश्यक पूर्वपरवानग्या घेऊन करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
Kankavli Land Dispute Assault Case : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी
November 25, 2026
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा
November 25, 2026
Dr Apoorva Basur appreciates student Spruha Dalvi's speech on Chhatrapati Shivaji Maharaj during her visit to Dodamarg school.
Dr. Apoorva Basur : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांची दोडामार्ग केंद्रशाळा नं. १ ला भेट
November 25, 2026
Chindar village in Malvan prepares for the traditional Gavpalan ritual beginning December 2, 2026.
Chindar Gavpalan 2026 : चिंदर गावची पारंपरिक गावपळण २ डिसेंबरपासून
November 25, 2026