LIVE UPDATES

दोडामार्ग नगरपंचायतीच्या वाढीव कामावर तिसऱ्यांदा नगरसेवकांचा हातोडा

मुख्याधिकाऱ्यांचे ठेकेदाराला काम थांबविण्याचे लेखी आदेश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 07:13 PM
views 19  views

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीतील पत्राशेड आणि फर्निचरच्या वाढीव कामाचा वाद पुन्हा चिघळला असून, यापूर्वी दोन वेळा बंद पाडलेले काम आज पुन्हा सुरू करण्यात आल्याने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे आणि नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील नागरिकांसह तिसऱ्यांदा घटनास्थळी धाव घेत हे काम बंद पाडले. यावेळी संबंधित ठेकेदार कामाच्या ठिकाणी उपस्थित नसताना काही कामगारांकडून काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. नगरसेवकांनी कामगारांना सुरू असलेले काम तात्काळ बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांची भेट घेऊन या कामाच्या वैधतेबाबत जाब विचारण्यात आला. बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर अखेर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला वाढीव काम तात्काळ थांबविण्याचे आणि केलेले वाढीव काम काढून टाकण्याचे लेखी आदेश दिले.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम गेल्या दोन – तीन वर्षांपासून सुरू आहे. या इमारतीच्या कामासोबतच पत्राशेड आणि फर्निचरचे वाढीव काम सुमारे पावणे तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चाच्या अनुषंगाने चर्चेत आले आहे. मात्र, या वाढीव कामासाठी आवश्यक तांत्रिक मंजुरी, ऑनलाइन निविदा प्रक्रिया आणि स्वतंत्र कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) नसल्याचा आक्षेप नगरसेवक संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांनी घेतला आहे. याच मुद्द्यावरून यापूर्वीही त्यांनी काम बंद पाडले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही आज पुन्हा काम सुरू करण्यात आल्याने नगरसेवकांसह उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आज काम सुरू असल्याची माहिती मिळताच संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. यावेळी संबंधित ठेकेदार उपस्थित नव्हता. मात्र, कामगारांकडून पत्राशेड व फर्निचरशी संबंधित काम सुरू असल्याचे दिसून आले. नगरसेवकांनी कामगारांना हे काम कोणत्या परवानगीने सुरू आहे, असा सवाल करत काम तात्काळ बंद करण्यास सांगितले.

त्यानंतर सर्वांनी नगरपंचायत कार्यालय गाठून मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्याकडे या प्रकरणाचा जाब मागितला. यावेळी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, ओमकार पेडणेकर, दादा बोर्डेकर, गौतम महाले, विठ्ठल बोर्डेकर, विकास लाड, करण ठाकूर, सुशांत राऊत, संजय खांबल, सुरेंद्र रेडकर, शिवम पांचाळ, सुनील म्हावळणकर आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.

सुरू असलेले काम कायदेशीर की बेकायदेशीर ?  

पत्राशेडचे सुरू असलेले काम कायदेशीर आहे की बेकायदेशीर, हे स्पष्टपणे सांगा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र, या प्रश्नावर मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळल्याने संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेकेदाराला यापूर्वीच पत्र काढल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, पत्र काढूनही प्रत्यक्षात काम पुन्हा कसे सुरू झाले, असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

चव्हाण साहेबांचे नाव घेऊन बदनामी करू नका!

यावेळी नगरसेवक रामचंद्र ठाकूर म्हणाले की, आम्ही सुद्धा भाजपाचेच आहोत. त्यामुळे उगाच आमच्या चव्हाण साहेबांचे नाव खराब करू नका. हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा दिला. कोणत्याही कामासाठी नियम आणि शासकीय प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे. वरिष्ठांच्या नावाचा आधार घेऊन नियमबाह्य कामांना समर्थन देण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदारावर गुन्हा दाखल करा!

परवानगी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण नसताना काम सुरू करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष नानचे आणि रामचंद्र ठाकूर यांनी केली. नगरपंचायतीच्या कामांमध्ये वारंवार अनियमितता होत असून, दोडामार्गच्या विकासाची वाट लावण्यास अधिकारीच कारणीभूत ठरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक इमारतींची कामे निकृष्ट आणि संशयास्पद पद्धतीने सुरू असल्याचे सांगत या सर्व प्रकाराला संबंधित अधिकारी आणि तुम्ही जबाबदार असल्याचे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सुनावले. 

बेकायदेशीर काम सुरूच राहिल्यास तुमचा सत्कार करणार ...

पत्राशेड आणि फर्निचरचे वाढीव काम ठेकेदाराकडून काढून घेतले नाही, तर तुमचा जाहीर नागरी सत्कार करू, असा उपरोधिक इशाराही यावेळी देण्यात आला. जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर काय कारवाई केली जाणार, याबाबतचे लेखी पत्र दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या दालनातून जाणार नाही, अशी भूमिका घेत नगरसेवक नानचे, ठाकूर आणि उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बराच वेळ ठिय्या मांडला.

अखेर मुख्याधिकाऱ्यांचे ठेकेदाराला लेखी आदेश

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी स्पष्ट उत्तरे देण्याऐवजी मौन बाळगल्याने नगरसेवकांनी या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांना सुनावले. अखेर या प्रकरणात मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांनी संबंधित ठेकेदार जॉन्सन फर्नांडीस, वेंगुर्ला यांना लेखी पत्र काढले. या पत्रात कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३ ऑगस्ट २०२३ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र, इमारतीवर पत्राशेड व फर्निचरचे वाढीव काम झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने हे वाढीव काम तात्काळ थांबवावे, केलेले वाढीव बांधकाम त्वरित काढून टाकावे आणि यापुढे कोणतेही अतिरिक्त काम करू नये, अशी सक्त ताकीद ठेकेदाराला देण्यात आली आहे. तसेच इमारतीचे काम मंजूर अंदाजपत्रकातील तरतुदीनुसारच करावे, अन्यथा करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मांडलेले ठिय्या मागे घेण्यात आले. 


ताजी बातमी

View all

देवगड किल्ला परिसरात गोवा बनावटीच्या दारूवर पोलिसांचा छापा
November 25, 2026
Kankavli Land Dispute Assault Case : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी
November 25, 2026
कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दहा दिवसांत दोडामार्ग-विजघर रस्त्याचे काम सुरू करा
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे परिसरात पावसाच्या हलक्या सरी
November 25, 2026
दहा दिवसांत दोडामार्ग-विजघर रस्त्याचे काम सुरू करा
November 25, 2026
Dr Apoorva Basur appreciates student Spruha Dalvi's speech on Chhatrapati Shivaji Maharaj during her visit to Dodamarg school.
Dr. Apoorva Basur : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांची दोडामार्ग केंद्रशाळा नं. १ ला भेट
November 25, 2026
Chindar village in Malvan prepares for the traditional Gavpalan ritual beginning December 2, 2026.
Chindar Gavpalan 2026 : चिंदर गावची पारंपरिक गावपळण २ डिसेंबरपासून
November 25, 2026