LIVE UPDATES

रक्षाबंधनापूर्वी भाऊ बनला 'हैवान', दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून हत्या

Roorkee Crime News : भावाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधन सणाच्या आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 26, 2026 14:14 PM
views 87  views

हरिद्वार : रक्षाबंधनापूर्वीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने बहीण-भावाच्या नात्याला तडा दिला आहे. बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्याची तयारी करत असतानाच त्या भावानेच त्या दोघींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

भावाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधन सणाच्या आधी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित भाऊ विक्की याला अटक केल्याचीही माहिती समोर येत आहे.

भावाला आपल्या दोन्ही बहिणींच्या चारित्र्यावर संशय होता. म्हणूनच त्याने त्या दोघींची हत्या केल्याची माहिती प्राप्त होत आहे. मंगळवारी संध्याकाळी आरोपी भावाने सर्वप्रथम प्रीत विहार येथील संगीता हिच्या घरी धाव घेतली. सायंकाळी ती घरापासून काही अंतरावर असलेल्या सेक्टर रोडवरून ई-रिक्षाने जात असताना तिच्या भावाने तिच्यावर गोळीबार केला.

गोळी लागल्याने तिच्या पोटात गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने सुमारे दोन किलोमीटरचे अंतर कापून सुभाष नगर येथे राहणारी त्याची दुसरी बहीण पुष्पा याच्या घरी दाखल झाला. तिथे पोहोचल्यावर पुष्पाने दरवाजा उघडताच त्याने तिच्यावरही गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून पुष्पाचे पती संदीप बाहेर आले. आरोपीने त्यांच्या खांद्यावर गोळी झाडून त्यांना जखमी केले आणि त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बहिणींना सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी संदीपवर उपचार सुरू आहेत. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासावरून कौटुंबिक वादामुळे हे कृत्य घडले असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमागच्या कारणांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.