
सावंतवाडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवसू परिसरात बेकायदेशीरपणे विनापरवाना बंदुका आणि दुर्मिळ खवले मांजराची खवले बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत ४ जणांना अटक केली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रचलेल्या तीन वेगवेगळ्या पथकांनी देवसू गावात धाडी टाकून एकूण ७० हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये चार बंदुका आणि खवले मांजराच्या १५४ खवल्यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने मंगळवारी पहाटे पावणेसातच्या सुमारास देवसू पलीकडचीवाडी येथील रहिवासी गजानन उर्फ अर्जुन सावंत (वय ४२) यांच्या घरावर पहिली कारवाई केली. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, तेथे २० हजार रुपये किमतीची एक ठासणीची बंदूक, १० हजार रुपये किमतीची एक काडतुसाची बंदूक आणि १.१३५ ग्रॅम वजनाची लहान-मोठी अशी एकूण १५४ खवले मांजराची खवले असा साठा आढळून आला.
पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल तात्काळ जप्त केला. दुसऱ्या कारवाईत दाणोली गावठणवाडी येथील अशोक लक्ष्मण सावंत (वय ६०) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या घरातून २५ हजार रुपये किमतीची एक ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली. तर तिसऱ्या छापा सत्रादरम्यान देवसू जाधववाडी येथील संतोष विठ्ठल जाधव (वय ४२) याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची एक ठासणीची बंदूक हस्तगत करण्यात आली.
अधिक तपासात ही बंदूक देवसू मधलीवाडी येथील रहिवासी सुरज धर्मेंद्र सावंत (वय २९) याची असून त्याने ती संतोष जाधव याच्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही धडक कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, तसेच पोलीस अंमलदार निलेश परब, महेश निरवडेकर, ज्योती दुधवडकर, अमित राऊळ, संतोष गलोले, रामदास जाधव, मनिष शिंदे, सचिन चव्हाण, अमिता दळवी आणि पुजा भाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.














