
नवी दिल्ली : एका पतीने आपल्या पत्नीला खोलीत कोंडून विटेने मारहाण करून तिची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बस्ती येथून समोर आली आहे. वाल्टरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहेरिया गावात ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बहेरिया गावातील रहिवासी फूलचंद यांची पत्नी किरण ही शिवणकाम आणि भरतकामाचे काम करायची. फूलचंदला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तो अनेकदा नशेत घरी यायचा आणि पत्नीला मारहाण करायचा.
रविवारी रात्री उशिरा पती घरी आला, तेव्हा मुले ओट्यावर झोपली होती. तो खोलीत गेला आणि पत्नी किरणशी वाद घालू लागला. त्या आवाजामुळे मुलांना जाग आली. फूलचंदने आतून खोलीची कडी लावली आणि किरणच्या डोक्यावर विटेने वारंवार प्रहार केले.
किरण ओरडू लागली तेव्हा ओट्यावर असलेल्या तिचा मुलगा अमितने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आतून बंद होता. अमितने शेजाऱ्यांना सावध करण्यासाठी आरडाओरडा केला आणि मदतीसाठी विनवणी केली. अमितच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपी फूलचंदने दरवाजा उघडला आणि तो पळून गेला होता. किरणचा रक्ताने माखलेला मृतदेह खोलीतील जमिनीवर पडलेला आढळला.
या घटनेची गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलगा अमितने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याचे वडील फूलचंद यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.














