LIVE UPDATES

युवा नेमबाजांनी गाजवली मुंबई विद्यापीठ शूटींग स्पर्धा

खर्डेकर महाविद्यालयात आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 11:05 AM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#

वेंगुर्ला : शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-०४ अंतर्गत आयोजित पुरुष व महिला शूटींग स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. कोकण विभागातील विविध महाविद्यालयांतील युवा नेमबाजांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या नेमबाजी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

महिला गटातील एअर पिस्तुल प्रकारात चैत्राली करंगुटकर (खर्डेकर महाविद्यालय) हिने प्रथम, समिका गावडे (खर्डेकर महाविद्यालय) हिने द्वितीय, तर अमृता रेवंडकर (खर्डेकर महाविद्यालय) हिने तृतीय क्रमांक मिळविला. ओपन साईट प्रकारात तन्वी पारकर (कणकवली कॉलेज) हिने प्रथम, कोमल झोरे (एस.पी.के. सावंतवाडी) हिने द्वितीय, तर रिया परब (एस.आर.एम. कुडाळ) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

महिलांच्या पीप साईट प्रकारात साक्षी डांगे (डी.बी.जे. चिपळूण) हिने प्रथम क्रमांक मिळविला. ग्रीष्मा परब (एस.आर.एम. कुडाळ) हिने द्वितीय, तर सानिका गावडे (खर्डेकर महाविद्यालय) हिने तृतीय क्रमांक पटकावला.

पुरुषांच्या पीप साईट प्रकारात शमित लाखे (वाय.बी.आर.टी. सावंतवाडी) याने प्रथम, सहीश तलमकर (एस.पी.के. सावंतवाडी) याने द्वितीय, तर विनय सावंत (ए.सी.एस. कॉलेज, ओरोस) याने तृतीय क्रमांक मिळविला. ओपन साईट प्रकारात मार्तंड झोरे (एस.बी. कीर लॉ कॉलेज) याने प्रथम, साहिल तावडे (कणकवली कॉलेज) याने द्वितीय, तर उमाजी कदम (एस.आर.एम. कुडाळ) याने तृतीय क्रमांक मिळविला.

पुरुषांच्या एअर पिस्तुल प्रकारात सहीश तलमकर (एस.पी.के. सावंतवाडी) याने प्रथम क्रमांक मिळविला. सर्वार्थ जाधव (खर्डेकर महाविद्यालय) याने द्वितीय, तर अंकुश नाईक (खर्डेकर महाविद्यालय) याने तृतीय क्रमांक पटकावला.

ओपन साईट पुरुष सांघिक अजिंक्यपदात एस.आर.एम. कॉलेज, कुडाळने प्रथम क्रमांक पटकावला. कणकवली कॉलेज, कणकवलीने द्वितीय, तर बी.के.एस.व्ही. कॉलेज, लांजाने तृतीय क्रमांक मिळविला.

समारोपप्रसंगी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी आणि वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय स्पर्धांमधून आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणे ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

“शूटींगसारख्या क्रीडाप्रकारातून एकाग्रता, शिस्त, संयम आणि आत्मविश्वास या गुणांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा,” असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी खर्डेकर महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे कौतुक करून सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई आणि प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल खर्डेकर महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, आयोजक, क्रीडा विभाग, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, कोकण विभागीय क्रीडा समिती सचिव प्रा. शशांक उपशेटे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, जिमखाना प्रमुख डॉ. कमलेश कांबळे, क्रीडा संचालक प्रा. जयसिंग नाईक, गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. सुदाम माने, कांचन उपरकर, डॉ. चंद्रकांत नाईक, प्रा. सदाशिव चुकेवाड यांच्यासह क्रीडा विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेमुळे कोकण विभागातील युवा नेमबाजांना विद्यापीठस्तरीय व्यासपीठावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. शूटींग या क्रीडाप्रकारातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम, अचूकता, आत्मसंयम आणि मानसिक स्थैर्य विकसित होण्यास मदत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या क्रीडा विभागासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.