LIVE UPDATES

नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे गणेशोत्सव पूर्वतयारीला वेग

कुडाळ नगरपंचायतीचे युद्धपातळीवर काम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 10:32 AM
views 69  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : आगामी गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात नागरी सुविधा अधिक सक्षम व सुरळीत ठेवण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने पूर्वतयारीला वेग दिला आहे. नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे नगरपंचायतीचे विविध विभाग समन्वयाने फिल्डवर सक्रिय झाले असून, गणेशोत्सवापूर्वी आवश्यक असलेली विविध कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.

नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत बांधकाम विभागाकडून शहरातील खड्डे बुजविण्याचे काम, तसेच कुडाळ हायस्कूल परिसरातील साईडपट्टी सुस्थितीत करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात नागरिक, चाकरमानी व भाविकांना वाहतुकीस कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी रस्ते व सार्वजनिक सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

त्याचबरोबर आरोग्य विभागाकडून झाडी कटिंग, शहरातील अंतर्गत रस्ते व गणेश घाटाकडे जाणाऱ्या पायवाटांची साफसफाई तसेच फॉगिंगची कामे सुरू करण्यात आली आहेत. स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

नगरपंचायतीचा विद्युत विभागही सक्रिय झाला असून, शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती, हायमास्टची देखभाल व आवश्यक विद्युत सुविधांची तपासणी करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील प्रमुख ठिकाणी प्रकाशव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.

याबाबत बोलताना नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी सांगितले की, “गणेशोत्सव २०२६ साठी कुडाळ शहरातील सर्व नागरिक, चाकरमानी, पर्यटक आणि भाविक यांना उत्तम नागरी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कुडाळ नगरपंचायत पूर्णपणे दक्ष आहे. शहरातील सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवून पूर्वतयारीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

नगराध्यक्षांच्या नियोजनबद्ध नेतृत्वामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहराची पूर्वतयारी योग्य दिशेने सुरू असून, स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज होत आहे.