LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला वेग

नांदोस गढीत संग्रहालय, भगवंत गडाचा डिजिटल सर्व्हे होणार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 26, 2026 11:22 AM
views 98  views
#kokansadlive#news update#konkan update#

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ले आणि पुरातत्वीय वारशाच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेऊन मंत्री आशिष शेलार यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी नांदोस गढी, भगवंत गड आणि सिद्धगडाच्या संवर्धनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सिंधुदुर्ग येथील नांदोस गढी येथे ‘पुरातत्व स्थळ संग्रहालय’ (Site Museum) उभारण्यात येणार असून, त्याचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नांदोस गढीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच पर्यटक आणि इतिहासप्रेमींना या स्थळाची माहिती अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहे.भगवंत गडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल सर्व्हे करण्यात येणार आहे. या सर्व्हेच्या आधारे गडाची सद्यस्थिती, रचना आणि ऐतिहासिक अवशेषांचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. तर सिद्धगडाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गड परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदा उत्खनन होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नांदोस उपसरपंच विजय निकम यांच्यासह पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.