
सावंतवाडी : विद्यार्थी कौशल्य विकास हे नवीन शैक्षणिक धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट लक्षात घेऊन गायन आणि वादन कलेत निपुण असलेल्या विद्यार्थ्यांना सादरीकरणाची संधी देण्याच्या उद्देशाने राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग कलामंचावर 'श्रावणधारा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थी वर्गासह रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
श्रावण म्हणजे नवनिर्मिती ,चैतन्य आणि पर्जन्यसरींनी चिंब भिजून जाण्याचा महिना. याच पार्श्वभूमीवर राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तबला आणि हार्मोनियम वादक विद्यार्थ्यांनी गायकांना दिलेल्या संगीत साथीमुळे उत्तम अशा बहारदार गीतांचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, प्र. उपप्राचार्य प्रा . सविता माळगे, सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. माया नाईक, प्रा. वामन ठाकूर, प्रा. पुनम वाडकर तसेच प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते .मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तबला वादक मेस्त्री बंधूंनी आपल्या उत्कृष्ट तबलावादनाने या कार्यक्रमाला रंगत आणली. तसेच पियानो वादक तुळसकर याचीही संगीत साथ लाभली. एकूण ४५ विद्यार्थी गायकांनी अभंग, भावगीत, सिनेमा गीत आदी गायन प्रकार आपल्या सुमधूर आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
गौरव लाखे आणि पद्मश्री पास्ते यांनी 'सावन आया है' आणि 'रिमझिम गिरे सावन' या गीतातून श्रोत्यांकडून विशेष दाद मिळवली . कोमल परबच्या 'त्या वाटेवरी मोगरा', कस्तुरी तुळसकर च्या 'मी वनांतरी' तसेच प्रीती नाईक आणि इतर विद्यार्थ्यांच्या सुश्राव्य गीतांनी तर नवरंग कलामंच दणाणून सोडला. त्याचबरोबर शाळेचे माजी विद्यार्थी श्रीपाद कवठणकर आणि कु. पूर्वा धाकोरकर यांच्या गीतांनी एकूणच जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं होतं.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करून उत्साह चैतन्यमयी आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा उद्देश 'श्रावणधारा' या कार्यक्रमातून सफल झाला. ज्यु. कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडले .










