LIVE UPDATES

सातार्डा चेकपोस्ट दारू तस्करी प्रकरणात आणखी तिघांना अटक

सहा संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 09:30 PM
views 28  views

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा चेकपोस्टवर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सुमारे ४३ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि वीस लाखांचा टेम्पो असा एकूण ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली होती. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी भास्करप्रदिप रामाराव त्रिमलशेटी आणि व्यंकटनागरान गोपाळकृष्ण बालम या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते.

त्यानंतर चौकशीत आरोस येथील निरंजन आनंद नाईक आणि आंध्र प्रदेशमधील बॉबी पडाला या अन्य दोघांची नावे निष्पन्न झाली असून, या चौघांच्या संगनमताने ही बेकायदेशीर दारू वाहतूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या प्रकरणी गुरुवारी सावंतवाडी पोलिसांनी निरंजन आनंद नाईक उर्फ गोट्या, ३३, आरोस गावठणवाडी, प्रवीण शंकरम वंका, ३१ व मनिचा चंद्रशेखर कुमार स्वामी २२ दोघेही राहणार आंध्र प्रदेश या संशयितांना अटक केली.

तिघांनाही येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आणखीही काही नावे उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.