LIVE UPDATES

Sindhudurg Theft : ५७ लाखांच्या केबल चोरीचा काही तासांतच छडा

राजस्थान, हरियाणातील तिघांची कोठडीत रवानगी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 07:43 PM
views 183  views
Sindhudurg Local Crime Branch arrests three suspects in ₹57.40 lakh aluminium cable theft case in Kankavli.

कणकवली : कणकवली तालुक्यातील ओसरगाव - गवळवाडी येथे ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम लाईट केबल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांतच छडा लावला. या कारवाईत राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेली केबलची पाच बंडले आणि वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. न्यायालयाने तिन्ही संशयितांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ओसरगाव-गवळवाडी येथे ३ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ही चोरी झाली होती. याप्रकरणी व्यंकटरमना राकोटी (५४, रा. मालवण मूळ राहणार आंध्र प्रदेश) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे इरशाद खुर्शीद खान (३२), आरिफ खुर्शीद खान (३०) आणि शाहीद खुर्शीद खान (२४) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून चोरीस गेलेली पॅकिंगसह ॲल्युमिनियम केबलची पाच बंडले तसेच वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड, राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण देसाई, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.