LIVE UPDATES

Ashpak Mulani Murder Case : खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला जामीन मंजूर

अश्पाक मुलाणी हत्या प्रकरण; कठोर अटींसह ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 07:05 PM
views 64  views

कणकवली : आर्थिक देवाणघेवाणीतून बारामती येथील अश्पाक उर्फ निहाल मुलाणी (मुळ मारशिरस, सोलापूर) याचा खून करून अपघात झाल्याचा बनाव केला. तसेच मृतदेह फोंडाघाट येथील दरीत टाकल्याप्रकरणी प्रमुख संशयित कामोठे नवी मुंबई येथील मनोज नारायण भडंगे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश डॉ. सुधीर देशपांडे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.

२८ डिसेंबर २०२१ रोजी फोंडाघाट दाजिपूर खिंड येथील वळणावर पल्सर मोटारसायकल संरक्षण भिंतीला आदळलेली आढळून आली होती. यावेळी दरीत पडून एक इसम म्हणजे अश्पाक मुलानी हा मयत झाला होता. त्याबाबत कणकवली पोलिसांनी तपास करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा मयतावर दाखल केला होता. त्यानंतर १० जून २०२६ रोजी मुंबई क्राईम ब्रैंच युनीट ७ यांनी दिलेल्या माहितीवरून मनोज भडंगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे, ऋतुराज शेट्टी यांनी दोन सहकाऱ्यांसोबत पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून कुडाळ येथील लॉजवर मयत अश्पाकला दांड्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यात तो मयत झाल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी फोंडाघाटमध्ये आरोपीनी मध्यरात्रीच अपघाताचा बनाव रचला, अशी माहिती दिली होती.

त्यानुसार पुन्हा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासात अनेक धागेदोरे निष्पन्न झाले व आरोपींविरूद्ध दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले. यात प्रमुख संशयित आरोपी मनोज भडांगे याच्यावतीने जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना आरोपीने मोबाईल नंबर व रहिवासाच्या ठिकाणाचा पत्ता द्यावा, महाराष्ट्र सोडून जाऊ नये, मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधू नये, पासपोर्ट जमा करावे आदी अटी घालण्यात आल्या आहेत.