LIVE UPDATES

"वाघाची नखे आणि कोट्यवधींचा सौदा"

आपल्‍याला हे माहित आहे का ?
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 08:16 PM
views 52  views
Tiger claw smuggling case in Kudal, Sindhudurg, where forest officials seized 12 tiger claws and arrested three accused.

कुडाळ : सिंधुदुर्गातील कुडाळ बस डेपो परिसरात वनविभागाने सापळा रचला आणि उघडकीस आली ती थेट काळ्या बाजारातील थरारक कहाणी. चक्क बारा वाघनखे विकण्यासाठी आणणाऱ्या तीन जणांना जेरबंद करण्यात आले. पण विचार करा एका प्राण्याच्या अंगावरची ती नखे तुमच्यापर्यंत पोहोचण्यामागे किती मोठे रॅकेट काम करत आहे? प्रश्न पडतो ना, या मुक्या प्राण्यांच्या शिकारीची आणि अवयवांच्या तस्करीची एवढी मागणी का आहे?

समाजात अजूनही काही ठिकाणी वाघाची नखे किंवा दात गळ्यात घातल्याने ताकद वाढते, धाडस येते किंवा अधिकार गाजवता येतो, असा अंधविश्वास बाळगला जातो. काही लोक केवळ आपले स्टेटस दाखवण्यासाठी किंवा श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी अशा बेकायदेशीर गोष्टींचा वापर करतात. चिनी औषधशास्त्र आणि काही प्राचीन परदेशी पद्धतींमध्ये वाघ, बिबट्या किंवा इतर दुर्मीळ वन्यप्राण्यांच्या अवयवांचा वापर औषधे किंवा पावडर बनवण्यासाठी केला जातो, असा गैरसमज आहे. याच अंधश्रद्धेचा फायदा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यवधींची उलाढाल चालते.

आंतरराष्ट्रीय बाजारात एका वाघाच्या चर्म, नखे किंवा हाडांची किंमत लाखो ते कोटी रुपयांपर्यंत जाते. जंगलातील एका मुक्या प्राण्याचा जीव घेऊन काही ठराविक दलाल आणि तस्कर रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात. म्हणूनच, कुडाळ असो किंवा देशातील कोणतीही दुर्गम चौकट तस्करांचे जाळे हे पैशांच्या लोभासाठीच विणले जाते. मात्र, या हव्यासापोटी आपली नैसर्गिक संपत्ती आणि पर्यावरणाचा समतोल कसा ढासळत चाललाय, याचा विचार कधी केलाय का?

परिसरात वन्यप्राण्यांची शिकार, अवयवांची खरेदी-विक्री किंवा कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभाग किंवा स्थानिक पोलिसांना कळवा. निसर्ग वाचवा, मुके प्राणी वाचवा... कारण जंगलात वाघ किंवा बिबट्या असणे म्हणजे आपल्या पर्यावरणाचा श्वास सुरक्षित असणे आहे.

संकलन - स्वप्निल परब
मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद