LIVE UPDATES

चोरांनी डाव साधला, सीसीटीव्हीच चोरला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 04, 2026 03:43 PM
views 102  views
Missing CCTV cameras at Satuli Phata, Kesari Phata and Satam Maharaj Samadhi Temple in Danoli, Sawantwadi.

सावंतवाडी : गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पोलिसांना तपासात मदत व्हावी या उद्देशाने जिल्हा वार्षिक निधीतून २०२०-२१ मध्ये दाणोली परिसरातील सातुळी फाटा, श्री साटम महाराज समाधी मंदिर आणि केसरी फाटा येथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही ठिकाणी केवळ खांब शिल्लक असून काही ठिकाणी कॅमेऱ्यांच्या वायर कापलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे या सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल आणि सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर सीसीटीव्ही चोरणाऱ्यांना शोधण्याच आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

जिल्हा वार्षिक निधीतून २०२०-२१ साली या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र, आज या यंत्रणेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. श्री साटम महाराज समाधी मंदिर परिसरात सीसीटीव्हीचा स्टोरेज बॉक्स आजही अस्तित्वात आहे. मात्र, त्याला जोडलेल्या वायर कापण्यात आल्या आहेत.

सातुळी फाटा येथे सीसीटीव्ही बसविण्यात आलेला खांब शिल्लक असून त्यावरील कॅमेरे गायब आहेत. तर केसरी फाटा येथे कॅमेऱ्यांसह खांबही गायब झाल्याचे चित्र आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही दिसेनासे झालेत.

ही सीसीटीव्ही यंत्रणा नेमकी कधी गायब झाली ? ती चोरीला गेली की अन्य काही ? याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही. साटम महाराज समाधी मंदिर परिसरातील स्टोरेज बॉक्सवर महाराष्ट्र पोलिसांचे स्टीकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे या यंत्रणेची जबाबदारी पोलीस विभागाकडे होती का ? तसेच तिच्या देखभालीसाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती ? असे सवाल उपस्थित होत आहे. 

गेल्या काही काळात दाणोली दशक्रोशीमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांचा छडा लावण्यासाठी सावंतवाडी पोलिसांना परिसरातील शासकीय निधीतून बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाच बंद असल्याने तपास करताना खासगी आस्थापना आणि घरांमधील सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागत आहे.

यामुळे तपासात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यातच आता हीच संधी साधत चोरांनी चक्का सीसीटीव्हीच लंपास केल्याने या चोरांना शोध घेण्याच आव्हान पोलिसांसमोर उभं राहीलं आहे.