
सावंतवाडी : कोकणसाद’च्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, आम. निलेश राणेंची विशेष उपस्थिती होती. यंदाचा दिवाळी अंक कोकणची लोकसंस्कृती ‘दशावतार’ या संकल्पनेवर आधारित असून विविधतेनं नटलेला आहे. दशावतार कलावंतांच्या योगदानाला न्याय देणारा हा अंक असल्याचे उद्गार उपस्थितांनी काढले.
कोकणसादच्या प्रधान कार्यालयात हा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, कोकणसादचे संपादक संचालक संजय ढवळीकर, मुख्य संपादक सागर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, दशावतार कलावंत गौरव शिर्के आदींसह टीम कोकणसादचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मंत्री श्री. सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.
दैनिक कोकणसादनं केलेला अंक स्तुत्य असून दशावतार कलेला न्याय देणारा आहे. या अंकाला यंदाही राज्य शासनाचा पुरस्कार मिळो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसेच मालवणी भाषा ही केवळ बोलीभाषा नसून कोकणची समृद्ध सांस्कृतिक ओळख आहे. या भाषेचा अधिक व्यापक अभ्यास व्हावा, तिचे संशोधन, संवर्धन व्हावे यासाठी सिंधुदुर्गात मराठी भाषेचे जिल्हा विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्याने मालवणी भाषेवर संशोधन केले जाईल, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री श्री. सामंत यांनी दिली. याच कार्यक्रमात आम. निलेश राणेंनी केलेली मागणी मान्य करत त्यांनी ही घोषणा केली.

यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर म्हणाले, कोकणसादनं यंदाच्या दिवाळी अंकात दशावतार कलेला दिलेलं स्थान कौतुकास्पद आहे. हा अंक दशावताराची समृद्ध परंपरा सांगणारा एक दस्तऐवज आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ, त्यातील कलावंतांची छायाचित्रे आणि मांडणी पाहिल्यानंतर दशावतार कलेच मोठेपण लक्षात येतं. कोकणसादनं या माध्यमातून दशावतार परंपरेच महत्त्व अधोरेखित केलं आहे. कोकणसाद हा जनसामान्यांपर्यंत पोहचलेला मीडिया गृप आहे असे गौरवोद्गार श्री. केसरकर यांनी काढले.
याप्रसंगी शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मालवणी भाषेला मराठी भाषा विभागात समाविष्ट करून तिच्या विकासासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची मागणी केली. तसेच कोकणसाद हा 'नंबर वन' चा मीडिया असून एका उंचीवर चॅनल पोहचलं आहे. मी अनेक वर्षांचा या चॅनलचा सबस्क्राईबर आहे. आज दिवाळी अंकांच्या माध्यमातून दशावतार कलावंतांच्या योगदानाला न्याय देण्याच कार्य कोकणसादनं केलं आहे असे प्रतिपादन श्री. राणेंनी व्यक्त केलं.
प्रास्ताविकात मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी दिवाळी अंकाच्या दशावतार या विषय निवडीमागील संकल्पना विषद केली. तर फोमेंतो सिंधुदुर्ग मीडिया (महाराष्ट्र)चे संपादक संचालक संजय ढवळीकर यांनी उपस्थित मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक अनुजा कुडतरकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








