
सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलगाव मियासाब समाधी परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक व युवतीचा मृत्यू झाला. कार आणि दुचाकीत झालेल्या धडकेत युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर फरार झालेल्या कारचालक गोपाळ सुरेश गावडे (वय 36, रा.चौकुळ नेनेवाडी ) याला सावंतवाडी पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली.
या अपघातात कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. भालावल, सध्या रा. सावंतवाडी) आणि आयुषी अरविंद देसाई (रा. गोठोस, सध्या रा. सावंतवाडी) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही सावंतवाडीत राहून शिक्षण घेत होते. शुक्रवारी रात्री कार्तिक आपल्या दुचाकीवरून आयुषीसह सावंतवाडीवरून कोलगावच्या दिशेने जात होता. मियासाहेब समाधी परिसरात ते पोहोचले असता, कोलगावकडून सावंतवाडीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात आयुषी देसाई हिचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कार्तिक परब याला स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लादू रायका यांच्या मदतीने लगेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना काही तासांनी त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा केला. यावेळी सहाय्यक पोलिस फौजदार श्री. राऊत, पोलिस हवालदार सुरेश पाटील, पोलिस हवालदार श्री. धोत्रे, पोलिस हवालदार पवन परब उपस्थित होते.अपघातानंतर स्विफ्ट कारचालक गोपाळ सुरेश गावडे (वय ३६, रा. चौकुळ नेनेवाडी) याने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, सावंतवाडी पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर वेगाने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.














