LIVE UPDATES

माटणे अपघातातील गंभीर जखमी जयराम शिरोडकर यांचं निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 24, 2026 16:44 PM
views 107  views

दोडामार्ग : माटणे येथील वजन काट्याजवळ बुधवारी झालेल्या भीषण दुचाकी अपघातातील गंभीर जखमी जयराम शिरोडकर (रा. माटणे-तळेवाडी) यांचे शुक्रवारी पहाटे उपचार सुरू असताना गोवा बांबोळी येथे निधन झाले. त्यामुळे या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे. या घटनेमुळे दोडामार्गसह गोवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बुधवारी सायंकाळी माटणे येथील वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली होती. या भीषण अपघातात मये (डिचोली-गोवा) येथील दीपक हरमलकर (४५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर रामा सुरेश गवस, गणू उसपकर आणि जयराम शिरोडकर हे गंभीर जखमी झाले होते. तिघांनाही पुढील उपचारासाठी गोवा जीएमसी (बांबोळी) येथे हलविण्यात आले होते.

जयराम शिरोडकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे अपघातातील मृतांचा आकडा दोनवर गेला असून परिसरात शोककळा पसरली आहे. जयराम शिरोडकर यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.