
दोडामार्ग : आडाळी कोसमवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ची इमारत मोडकळीस आल्याने मुलांचे धडे सध्या किचनच्या खोलीत गिरविले जात आहेत. शुक्रवारी रात्री इमारतीच्या छपराची कौले पडल्याने मुलांच्या जीवितास आता धोका झाला आहे. वारंवार प्रशासनाला कळवून सुद्धा प्रशासन मुलांच्या जीवाशी खेळत असल्याने येथील पालक व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत 8 दिवसात शाळेच्या इमारतीची दुरुस्ती न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी मुलांनाच घेऊन उपोषण करणार आल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

आडाळी कोसमवाडी येथील जिल्हा परिषदच्या शाळेची इमारत अखेरची घटका मोजत असल्याने मुलांच्या शिक्षणावर मोठा परिणाम व जीवितास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात येथील पालक वर्ग व ग्रामस्थांनी गत वर्षी ग्रामपंचायत प्रशासन व शिक्षण विभाग दोडामार्ग यांना लेखी पत्र देऊन सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केला. शुक्रवारी रात्री त्या इमारतीच्या छपरीची कौले अखेर पडली. रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. आता तरी प्रशासनाने जागे होऊन 8 दिवसात शाळेची दुरुस्थी करावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी मुलांना घेऊन उपोषण करू असा इशारा पालक व ग्रामस्थ यांनी दिला आहे.














