LIVE UPDATES

विजयदुर्ग सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 24, 2026 12:34 PM
views 236  views

देवगड : महाराष्ट्र शासनाने सरपंचपदाच्या आरक्षणामध्ये केलेल्या सुधारणेनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या तालुक्यात सरपंचपदांची संख्या जास्त आहे तिथे बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार देवगड तालुक्यात (एकूण ७२ ग्रामपंचायती) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) मधील १ पद कमी करून ते खुल्या प्रवर्गात वाढवण्यासाठी शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी हे आरक्षण चिठ्ठीद्वारे विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शीतल जाधव यांनी जाहीर केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 432 ग्रामपंचायत साठी आरक्षण प्रक्रिया या आधीच पूर्ण झाली होती . मात्र त्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ११७ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या होत्या.शासनाच्या २७ टक्के आरक्षण निकषानुसार जिल्ह्यात नामाप प्रवर्गाच्या ११६ जागा आरक्षित असणे आवश्यक होते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्त ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी ही आरक्षण प्रक्रिया देवगड तालुक्यात शुक्रवारी राबविण्यात आली. देवगड तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायत असून यातील २० जागा या नामाप्र साठी आरक्षित आहे.यामध्ये १० जागा महिलांसाठी असून ५० टक्के निकषानुसार त्या सर्व जागा पूर्व आरक्षण प्रक्रियेनुसार आरक्षित आहेत.तर पुरुष प्रवर्गाच्या १० जागांमधील विजयदुर्ग ग्रामपंचायत ही १ जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.

या आरक्षणावेळी उबाठा शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र जोगल, शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, शिरगांव सरपंच समीर शिरगांवकार, तोरसोळे सरपंच तेजस्विनी पवार आदी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष खरात, विवेक शेठ उपस्थित होते.