LIVE UPDATES

कालची सरावपटू आज प्रमुख पाहुणी; पूर्वाच्या आठवणींनी पोलीस मैदान गहिवरले

पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते नव्हे, तर पूर्वा गावडेच्या हस्ते झाला गुरुजनांचा सत्कार; ३९ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा भावनिक समारोप
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 07:57 PM
views 71  views
International swimmer Purva Gawade attends the 39th Sindhudurg District Police Sports Competition closing ceremony as chief guest.

सिंधुदुर्गनगरी : ज्या पोलीस कवायत मैदानावर बालपणी धावण्याचा सराव केला, ज्या मैदानावर पोलिसांचा व्यायाम आणि शिस्त पाहून स्वतःच्या स्वप्नांना बळ मिळाले, त्याच मैदानावर आज प्रमुख पाहुणी म्हणून उभे राहण्याचा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. एकेकाळी ज्यांच्याकडून धावण्याचे धडे, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले, त्याच पोलीस अधिकाऱ्यांचा आज आपल्या हस्ते सत्कार करण्याची संधी मिळणे, हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, अशा भावनिक शब्दांत आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. तिच्या या मनोगताने ३९ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांच्या समारोप सोहळ्याला अनोखी भावनिक उंची प्राप्त झाली.

शुक्रवारी (३० ऑक्टोबर) पोलीस कवायत मैदानावर या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणी म्हणून पूर्वा गावडे उपस्थित होती. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूर्वा गावडे हिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, आई लहानपणापासूनच जलतरण आणि धावण्याच्या सरावासाठी मैदानावर घेऊन जात असे. त्यावेळी पोलीस मैदानावर सराव करणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांकडे पाहून त्यांच्यासारखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळत असे. पोलीस प्रदीप चव्हाण आणि कमलेश सोनवणे यांनी धावण्याचे तंत्र, नियमित सराव आणि मेहनतीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळेच आपल्या क्रीडा प्रवासाला योग्य दिशा मिळाली. आज याच मैदानावर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब असल्याचे तिने सांगितले.

पूर्वाच्या या मनोगतातून क्रीडा क्षेत्रातील यशामागे असणारे परिश्रम, मार्गदर्शकांचे योगदान आणि कृतज्ञतेची भावना अधोरेखित झाली. विशेष म्हणजे, ज्या मैदानावर कधीकाळी ती स्वतः खेळाडू म्हणून घडत होती, त्याच मैदानावर आज तिने आपल्या मार्गदर्शकांचा सन्मान केला. उपस्थितांनीही तिच्या या भावनिक प्रवासाचे कौतुक केले.

खेळामुळे ताणतणाव कमी होऊन कार्यक्षमता वाढते : डॉ. दहिकर

पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना दैनंदिन कर्तव्य बजावताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत क्रीडा स्पर्धा शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासोबतच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. खेळामुळे शारीरिक क्षमता वाढते, मन प्रसन्न राहते आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी मानसिक खंबीरता निर्माण होते. त्यामुळे प्रत्येकाने खेळातील खिलाडूवृत्ती जपत स्वतःला निरोगी आणि सुदृढ ठेवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, खो-खो, भालाफेक, गोळाफेक, थाळीफेक तसेच विविध धावण्याच्या स्पर्धांचा समावेश होता. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कौशल्य दाखविले. नाग्या महादू वस्तीग्रामातील चिमुकल्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचेही डॉ. दहिकर यांनी विशेष कौतुक केले.

क्रीडागुणांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न

प्रास्ताविकात अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांमध्ये असलेल्या सुप्त क्रीडागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचेही त्यांनी अभिनंदन केले.

खेळातील चुरस, खिलाडूवृत्ती आणि सांघिक भावनेचा प्रत्यय देणाऱ्या या स्पर्धांचा समारोप उत्साहात झाला. मात्र, या सोहळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते पूर्वा गावडेच्या भावनिक मनोगताने! कालपर्यंत ज्या मैदानावर ती स्वतःच्या स्वप्नांसाठी धावत होती, आज त्याच मैदानावर तिच्या यशाचा गौरव होत होता. एका खेळाडूच्या संघर्षापासून प्रेरणादायी यशापर्यंतचा हा प्रवास उपस्थितांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.


ताजी बातमी

View all

Ancient temple ruins and historical stone sculptures discovered in Dhamapur village of Sangameshwar, Ratnagiri.
Dhamapur Ancient Temple and Palace : रानवेलींच्या कुशीत विसावलेला चालुक्यकालीन इतिहास
October 30, 2026
देवगडच्या वाडातरमध्ये गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीचा छापा
October 30, 2026
Posco Act awareness campaign in Sindhudurg
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सिंधुदुर्गात वर्षभर जनजागृती अभियान
October 30, 2026
कुडाळमध्ये महिला बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचे वाटप
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

Glenn Phillips celebrates his century during the India vs New Zealand fourth T20 match in Auckland.
India vs New Zealand 4th T20 : न्यूझीलंडचा भारतावर ८७ धावांनी दणदणीत विजय
October 30, 2026
 Lasith Malinga, Paras Mhambrey and Carl Hopkinson part ways with Mumbai Indians ahead of IPL 2027.
आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठे बदल, लसिथ मलिंगासह 'या' दोन प्रशिक्षकांना रामराम
October 29, 2026
Sanketa Sawant and Sai Sawant, sisters who run Eagle Taekwondo Training Centre in Ratnagiri.
Ratnagiri News : दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र
October 29, 2026
सावंतवाडीच्या बाळकृष्ण पेडणेकरची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाजी
October 29, 2026