
दोडामार्ग : दोडामार्ग ते तिलारी या महत्त्वपूर्ण राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान निर्माण झालेल्या समस्या, अपूर्ण कामे आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेऊन आमदार दीपक केसरकर यांनी शुक्रवारी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) पुणे येथील कार्यकारी अभियंता प्रदीप तिवारी यांच्यासह त्यांनी विविध ठिकाणी भेट देत कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. यावेळी रस्त्याच्या कामातील त्रुटी दूर करून दर्जेदार काम करण्यासह स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय टाळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आ. केसरकर यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
दोडामार्ग ते विजघर हा नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. गतवर्षी या राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, कामादरम्यान अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आ. केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, उपसभापती गणेशप्रसाद गवस, जि. प. सदस्य दीपक गवस, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, युवासेना प्रमुख भगवान गवस, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, सरपंच सेवा संघाचे प्रवीण गवस, एमएसआरडीसीचे अधिकारी, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्त्याचे काम केवळ पूर्ण करण्याचा औपचारिकपणा न करता ते दर्जेदार, टिकाऊ आणि नागरिकांच्या सोयीचे होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. काम सुरू असताना ग्रामस्थांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच अपूर्ण कामे आणि निर्माण झालेल्या अडचणींचे तातडीने निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मिनी कॉलनीतील अरुंद पुलाचा प्रश्न मार्गी लागणार; नव्या पुलाची उभारणी होणार!
या पाहणी दौऱ्यात तिलारी नदीवरील मिनी कॉलनी येथील अरुंद पुलाचा प्रश्नही प्राधान्याने चर्चेत आला. सध्याचा पूल अरुंद असल्याने या ठिकाणी वाहनांच्या वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. मात्र, पुलाचे बांधकाम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठेकेदाराला पर्यायी मार्गाची आवश्यकता भासणार आहे. हे लक्षात घेऊन आमदार केसरकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी मार्गासाठी आवश्यक असलेल्या जागेचीही पाहणी केली.
पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, तसेच स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था आधीच निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. पर्यायी मार्गाचा प्रश्न मार्गी लावून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
रस्त्याच्या दर्जाबाबत तडजोड नको
यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले की, तिलारी ते दोडामार्ग रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, तसेच काम सुरू असताना स्थानिक ग्रामस्थांना अनावश्यक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे.
मिनी कॉलनी येथील तिलारी नदीवरील पूल अरुंद असल्याने त्याची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी पर्यायी मार्गाची आवश्यकता असल्याने त्या जागेचीही पाहणी केली आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था करून पुलाचे काम ग्रामस्थांना सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तिलारी-दोडामार्ग मार्ग दर्जेदार आणि टिकाऊ व्हावा, यासाठी आपण स्वतः लक्ष घालत असून, रस्त्याबरोबरच महत्त्वपूर्ण पुलाचे कामही लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








