
रत्नागिरी : प्रशिक्षण वर्गातील साध्या लादीवर कसून सराव करणाऱ्या बालवयापासून ते थेट व्यासपीठावर पंच म्हणून गौरव स्वीकारण्यापर्यंत संकेता संदेश सावंत हिने तायक्वांदो या मार्शल आर्ट प्रकारात स्वतंत्र ठसा उमटवला आहे. इयत्ता चौथीत असताना या क्रीडा प्रकारात पाऊल ठेवणाऱ्या एका सामान्य मुलीने १८ वर्षांच्या अखंड साधनेतून मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच म्हणून सिद्ध केले आहे.
रत्नागिरी शहरात पुरुष प्रशिक्षकांचे विविध प्रशिक्षण वर्ग कार्यरत असताना, दोन सख्ख्या बहिणी आणि महिला प्रशिक्षिका मिळून चालवत असलेले ‘ईगल तायक्वांदो केंद्र’ हे रत्नागिरी शहरातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. शालेय वयात सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीवर मात करत संकेताने सराव सुरू केला.
पहिल्याच सुवर्णपदकासह तिच्या यशाचा आलेख चढता राहिला. "मुलांचा मारामारीचा खेळ" म्हणून सुरुवातीला होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करत तिने जिल्हा, राज्य व विद्यापीठ स्तरावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. सेकंड दॅन ब्लॅक बेल्ट मिळवण्यासोबतच तिने राष्ट्रीय पंच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तिने अधिकृत पंच म्हणून निष्पक्ष कामगिरी बजावली आहे. ज्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातून शिकताना तिने विद्यापीठ पदक जिंकले होते, तेथेच आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत तीन दिवस पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. याबद्दल तिचा गौरव करण्यात आला.
संकेताचा हा प्रवास पाहता पाहता धाकटी बहीण सई हिनेही या मैदानात प्रवेश केला. राज्य आणि विद्यापीठ स्तरावर पदक मिळवत ती फर्स्ट दॅन ब्लॅक बेल्ट झाली, राष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवले. संकेताला मिलिंद भागवत आणि शाहरुख शेख, प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभले.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश कररा, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, पंच प्रमुख भरत कररा यांचेही मार्गदर्शन मिळतं. नवीन केंद्रासाठी राम कररा व शशीरेखा कररा यांचे सहकार्य लाभले. संकेताच्या या वाटचालीत आई सोनाली, वडील संदेश सावंत, आजी संपदा सावंत आणि आजोबा संभाजी सावंत यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन मोलाचे ठरले.
“आमच्या अकादमीत सध्या अनेक मुले-मुली जिल्हा व संघटनात्मक स्पर्धांमध्ये, बेल्ट एक्झाममध्ये यश मिळवत आहेत. मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरता निर्माण होते. यामुळे पालकांकडूनही प्रशिक्षणाला मोठी पसंती मिळत आहे.”
-संकेता सावंत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








