
गाझियाबाद : भारतीय क्रीडा विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. एका आघाडीच्या भारतीय पॅरा-ॲथलीटचे आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. आत्महत्या केलेल्या खेळाडूचे नाव नीरज यादव असून त्यांनी आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन वेळा सुवर्णपदक जिंकले होते.
प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सध्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू असून त्यांनी विष पिले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
२०१८ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतात परतल्यावर नीरज यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून नीरज यादव यांचा एक फोटो शेअर केला होता. २०२३ मध्ये जेव्हा नीरज यादव यांनी दोन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत सुवर्णपदके जिंकली तेव्हाही पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले होते.
४२ वर्षीय नीरज यादव 'एफ-५५' कॅटेगरीमध्ये खेळत असे. या कॅटेगरीमध्ये खेळाडू बसून आपली क्रीडा स्पर्धा पूर्ण करतात. त्यांनी विविध पॅरा-गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केले जात आहे. तिथे इतर अनेक पॅरा-ॲथलीटही उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूमागची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
भारताचे मुख्य पॅरा-ॲथलेटिक्स प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, नीरज यादव यांच्या आत्महत्येची बातमी मला मिळाली. मला सांगण्यात आले की, त्याने काल रात्री आपल्या घरी विष प्राशन केले. ही अत्यंत दुर्दैवी आणि शोकांतिका आहे."
प्रशिक्षकांच्या मते, नीरज यादव कदाचित डिप्रेशनमध्ये असावा. त्यांनी सांगितले की, 'डोपिंग'च्या आरोपाखाली निलंबन झाल्यामुळे नीरज यादव 'आयची-नागोया' आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होऊ शकले नव्हते, त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








