
कुडाळ : 80 च्या दशकाच्या सुरुवातीला कुडाळमध्ये केवळ उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतच सोय होती. बारावीच्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सावंतवाडी किंवा वेंगुर्ला येथे जावे लागे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित ‘कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेने २५ जून १९८४ रोजी कुडाळमध्ये पिंगुळीचे संत परमपूज्य राऊळ महाराज यांच्या नावाने ‘परमपूज्य राऊळ महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय’ सुरू केले, ज्याचे पुढे “संत राऊळ महाराज महाविद्यालय” असे नामकरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि काळाची गरज ओळखून संस्थेने सन १९९६ मध्ये विज्ञान शाखा, तर २००२ पासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले. आज या महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान यांसह संगणक शास्त्र, माहिती व तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अकाऊंटींग व फायनान्स यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण मिळत आहे. तसेच रसायनशास्त्र, गणित, प्राणिशास्त्र, संगणकशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचे पदव्युत्तर शिक्षणही उपलब्ध आहे.
उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा आणि शिस्तबद्ध वातावरणामुळे हे महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य ठरले असून, २०१० मध्ये यास मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारही प्राप्त झाला आहे. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक, एन.एस.एस., एन.सी.सी. तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणारे हे एकमेव महाविद्यालय आहे.
महाविद्यालयाच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) संत राऊळ महाराज महाविद्यालय आता ‘स्वायत्त महाविद्यालय’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्वायत्ततेमुळे विद्यापीठाशी संलग्नता कायम ठेवून, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, परीक्षा आणि मूल्यमापन याबाबत आवश्यक स्वातंत्र्य मिळाले आहे.
यामुळे स्थानिक गरजा, विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन लवचिक व कौशल्याधारित शिक्षण देणे शक्य होणार आहे. पर्यटन, मत्स्यव्यवसाय, कृषी, पर्यावरण संवर्धन, डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्रामीण उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांतून जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण योगदान देणार आहे.
हे महाविद्यालय स्वायत्त होण्यासाठी संस्थेचे सहकार्यवाह महेंद्र गवस यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण ठरले असून, प्राचार्या सौ. स्मिता सुरवसे यांनीही विशेष प्रयत्न केले आहेत. या स्वायत्ततेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन नवीन पिढीला अधिकाधिक सक्षम करण्याचा संस्थेचा भर आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा पुरेपूर लाभ घेऊन आपले भवितव्य उज्ज्वल करावे, असे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








