
देवगड : जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत वाडा हायस्कूलची विद्यार्थिनी कुंजल दिनेश गावकर हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने १०० मीटर धावणे, गोळाफेक आणि भालाफेक या तिन्ही क्रीडा प्रकारांत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून, ती विभागीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषदेतर्फे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग क्रीडा संकुलाच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधून तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. वाडा हायस्कूलच्या १६ खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांसाठी निवड झाली होती. त्यापैकी कुंजल गावकर हिने तीन वेगवेगळ्या प्रकारांत द्वितीय क्रमांक मिळवत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या यशस्वी खेळाडूला प्रशालेचे क्रीडाशिक्षक उत्तरेश्वर लाड आणि तिचे वडील दिनेश गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहायक शिक्षक हरिश्चंद्र कुबल, निलेश तिर्लोटकर आणि भूषण दातार यांचे सहकार्य मिळाले.
कुंजलच्या या यशाबद्दल लोकल कमिटीचे अध्यक्ष शांतराम पुजारे, शाळा समितीचे अध्यक्ष हर्षद जोशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता तेली, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील पालकवर्गाने तिचे अभिनंदन केले. तसेच डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








