
देवगड : ‘दौड आरोग्याची, साद पर्यटनाची’ या ब्रीद वाक्यावर आधारित रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगडच्या वतीने ‘देवगड कोस्टल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन रविवारी ३१ जानेवारी २०२७ रोजी करण्यात येणार आहे. देवगडच्या पर्यटनाला चालना देतानाच नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामाविषयी जनजागृती करणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धेचा मार्ग देवगड येथील डायमंड हॉटेल ते कातवण असा असणार असून, स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या धावपटूंनी १५ जानेवारी २०२७ पर्यंत https://alpharacingsolution.com/e/devgad-hm-2027 या संकेत स्थळावरती ऑनलाइन नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
देवगडची निसर्गरम्य किनारपट्टी, सुंदर समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांची ओळख व्यापक व्हावी, तसेच क्रीडा पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतानाच धावण्याच्या माध्यमातून देवगडच्या पर्यटन विकासाची साद घालण्याचा रोटरी क्लबचा प्रयत्न आहे.
स्पर्धेमध्ये २१ किलोमीटर, ११ किलोमीटर आणि ५ किलोमीटर फन रन अशा तीन प्रकारांचा समावेश आहे. २१ किलोमीटर स्पर्धेसाठी पुरुष व महिला गट स्वतंत्र असतील. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपये रोख पारितोषिक व पदक देण्यात येणार आहे. या प्रकारासाठी प्रवेश शुल्क १२०० रुपये आहे.
११ किलोमीटर स्पर्धेतील पुरुष व महिला गटांसाठीही स्वतंत्र पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये रोख पारितोषिक व पदक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ८०० रुपये आहे.
या शिवाय ११ किलोमीटर प्रकारात ४५ ते ५५, ५५ ते ६५ आणि ६५ वर्षांवरील अशा स्वतंत्र वयोगटांतील पुरुष व महिला स्पर्धकांसाठीही स्पर्धा होणार आहे. या प्रत्येक वयोगटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
५ किलोमीटर फन रनसाठी प्रवेश शुल्क ४०० रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, पदक आणि ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच १५ डिसेंबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश शुल्कात १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी इच्छुक धावपटूंनी https://alpharacingsolution.com/e/devgad-hm-2027 लिंकवर जाऊन ऑनलाइन नावनोंदणी करावी .
या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या अध्यक्ष अनुश्री पारकर, स्पर्धाप्रमुख रोटेरियन गौरव पारकर आणि रोटेरियन अनिल गांधी उपस्थित होते. ‘दौड आरोग्याची, साद पर्यटनाची’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








