
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याचे नाव समोर आले आहे. तपास प्रक्रियेशी संबंधित सूत्रांनुसार बुधवारी अखरान भागात हा हल्ला लतीफनेच घडवून आणला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी कुलगाममध्ये सुमारे २०० 'ओव्हरग्राउंड वर्कर्स'ना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर या सर्वांना सोडण्यात आले आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अखरान भागातील सीआरपीएफ चौकीवर हा हल्ला झाला. एक दहशतवादी दाट झाडांच्या आडून बाहेर आला आणि त्याने चौकीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सीआरपीएफ जवानांनीही प्रत्युत्तर दिले. यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आणि लतीफला घटनास्थळावरून पळून जावे लागले.
तपासातून असेही समोर आले आहे की, लतीफसोबत आणखी एक दहशतवादी उपस्थित असण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, सुरक्षा यंत्रणांनी जखमी सीआरपीएफ जवानांना मोहम्मद लतीफ भटचा फोटो दाखवला असता त्यांनी त्यालाच या हल्ल्यात सामील असलेला दहशतवादी म्हणून ओळखले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








