LIVE UPDATES

Konkan Heritage Exploration : दगडांत कोरला कोकणचा इतिहास

अपरिचित लेणी अन् कातळशिल्पांचा शोध; 'लेणी संवाद'चा राजापूर ते देवगड तीन दिवसीय अभ्यास दौरा
Edited by: लक्ष्‍मण आडाव
Published on: November 14, 2026 12:06 PM
views 1681  views
Ancient rock-cut caves and archaeological heritage sites explored during the Konkan heritage study tour in Rajapur and Devgad.

सिंधुदुर्ग : डोंगरांच्या कुशीत... दगडांच्या पोटात... काळाच्या पडद्याआड लपलेला आहे कोकणचा हजारो वर्षांचा इतिहास! या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी काही माणसं निस्वार्थपणे धडपडत आहेत. त्यांच्यासाठी हा केवळ दगडांचा अभ्यास नाही, तर आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेल्या अमूल्य वारशाचा शोध आहे.

कोकणातील याच अपरिचित ऐतिहासिक वारशाला जगासमोर आणण्याच्या ध्यासातून 'लेणी संवाद'चे प्रफुल्ल पुरळकर यांनी ९ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राजापूर ते देवगड असा तीन दिवसीय अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात तब्बल ९ एकाश्म लेणी, ३ कातळशिल्पे आणि काही ऐतिहासिक स्थळांची पाहणी करण्यात आली.

राजापूर तालुक्यातील कोदवली, गोठणे-दोनिवडे आणि पांगरे बुद्रुक येथील आठ एकाश्म लेण्यांचा अभ्यास करण्यात आला. कोदवली व गोठणे-दोनिवडे येथील लेण्यांवर पत्रकार व संशोधक विनोद पवार, तर पांगरे बुद्रुक येथील लेण्यांवर प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी यापूर्वी संशोधन केले आहे. याशिवाय चुना कोळवण येथील सवतकडा धबधबा आणि कोदवली येथील सायबाचे धरण यांचीही पाहणी करण्यात आली.

देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील एकाश्म लेणी तसेच पाळेकरवाडी, बापर्डे आणि पडेल येथील तीन कातळशिल्पांचा अभ्यास करण्यात आला. या स्थळांवर इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी संशोधन केले आहे. वाडा-गावठाण येथील टिपवणे परिसरातील जुन्या पाण्याच्या कुंडाची आणि अर्धवट कोरीव कामाचीही पाहणी करण्यात आली.

या ऐतिहासिक शोधमोहिमेत गुरुनाथ सावंत, सूर्यकांत साळुंखे, विशाल साळुंखे, राज साळुंखे, सुशील मणचेकर, अमित पुरळकर, रणजित हिर्लेकर, विनोद पवार, प्रवीण पवार, दीपक सागवेकर, अनंत जानस्कार, प्रकाश जानस्कार आणि अक्षय गिजम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. डॉ. अंजय धनावडे आणि मोडी लिपी व प्राचीन इतिहासाचे अभ्यासक अनिल दुधाने यांचे मार्गदर्शन मिळाले.

'लेणी संवाद' आणि 'एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह, महाराष्ट्र राज्य' यांच्या माध्यमातून प्रफुल्ल पुरळकर महाराष्ट्रातील अपरिचित लेणी, कातळशिल्पे आणि दुर्लक्षित ऐतिहासिक वारसास्थळांचा शोध, अभ्यास व माहिती संकलनाचे कार्य सातत्याने करत आहेत. देवगड तालुक्यातील पुरळ हे त्यांचे मूळ गाव असून सध्या ते मुंबईत वास्तव्यास आहेत.

काळ पुढे जातो... पिढ्या बदलतात... पण दगडांमध्ये कोरलेल्या इतिहासाच्या खुणा आजही बोलत असतात! या खुणा नष्ट होण्यापूर्वी त्यांचा शोध घेणे, त्यांचा इतिहास जतन करणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी वारशाची सेवा आहे. कोकणातील दुर्लक्षित ऐतिहासिक ठेवा उजेडात आणण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार प्रफुल्ल पुरळकर यांनी व्यक्त केला.