
सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या विकासाच्या आणि पर्यटन, रोजगार, अर्थक्रांतीच्यादृष्टीने अत्यंत पाऊल पडत असून देशातील पर्यटकांना सिंधुदुर्गत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ आता पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू होत असून १६ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी थेट विमानसेवा आठवड्याच्या सातही दिवस सुरू होणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
मंत्री श्री. म्हणाले, यामुळे कोकणातील पर्यटनाला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे. १९९९ मध्ये नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केले होते. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे आणि आर्थिक समृद्धी यावी, या दूरदृष्टीने जिल्ह्यासाठी हक्काचे विमानतळ असावे म्हणून चिपी येथे विमानतळाचे भूमीपूजन व स्थापना झाली होती.
मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा काहीकाळ बंद पडली. त्यानंतर दीपक केसरकर, उदय सामंत, रविंद्र चव्हाण या सर्व पालकमंत्र्यांनी विमानतळ सुरू होण्यासाठी प्रयत्न केले होते. आज महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे याला यश आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनीही विमानतळ चालवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
हे विमानतळ कायमस्वरूपी व सुरळीत सुरू ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे 'व्हायबल गॅप फंडिंग' राज्य मंत्रिमंडळाने उपलब्ध करून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आणि महाराष्ट्र विमानतळ कॉर्पोरेशनचे प्रमुख दीपक कपूर व इतर अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे आज मोठ्या एअरलाईन्स इथे उतरण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
यातच ताज सारखे मोठे प्रकल्प वेळागर आणि देवगड येथे येत असून सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. या विमानसेवेमुळे टूर गाईडपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार असून स्थानिक तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे सोमवारी फक्त विमान उड्डाण होत नाही तर खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला १६ नोव्हेंबरपासून मोठे 'टेक ऑफ' मिळत आहे, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील नागरिकांनी व तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सिंधुदुर्गाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








