
नवी दिल्ली : तुम्हाला मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्याची सवय आहे का? असल्यास ही बातमी तुमच्यासाठी. भारतीय रेल्वेने यासंदर्भात एक नियम लागू केला आहे. रेल्वेच्या डब्यात मोठ्या आवाजात फोनवर बोलल्यास किंवा जोरात म्युझिक वाजवल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना इशारा दिला आहे की, डब्यात मोठ्या आवाजात फोनवर बोलल्यास किंवा जोरात म्युझिक वाजवल्यास १ हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. पूर्व रेल्वेने आपल्या अखत्यारीतील सर्व स्थानकांसाठी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
रेल्वेने प्रवाशांना मोबाईल फोनवर स्पीकर मोडचा वापर करून म्युझिक किंवा व्हिडिओ न वाजवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, प्रवाशांना फोनवर दीर्घकाळ किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळण्यास आणि रिंगटोनचा आवाज मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या वागण्यामुळे विशेषतः एसी डब्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बंदिस्त जागेत आवाज घुमल्यामुळे झोपणे कठीण होते.
पूर्व रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर 'रेल्वे कायदा १९८९' (सुधारित) च्या कलम १४५ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. या तरतुदीनुसार १,००० रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. रेल्वेने हेही स्पष्ट केले आहे की टीटीई किंवा त्याहून वरिष्ठ दर्जाचे कर्मचारी अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यास अधिकृत आहेत.
याव्यतिरिक्त, जनजागृती करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर आणि शक्य असेल तिथे रेल्वेगाड्यांच्या आतही प्रादेशिक भाषा, हिंदी आणि इंग्रजीमध्ये नियमित घोषणा केल्या जातील.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








