LIVE UPDATES

Nitesh Rane : पंचायत समिती नूतन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी देणार : मंत्री नितेश राणे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 21, 2026 06:23 PM
views 62  views
Nitesh Rane and Deepak Kesarkar at the foundation stone ceremony of Sawantwadi Panchayat Samiti building

सावंतवाडी : राज्यातील महायुती सरकार ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी तब्बल १४.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे काम उर्वरीत २३ महिन्यांत कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय व तक्रारीविना अतिशय दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी स्पष्ट सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तसेच सावंतवाडी मतदारसंघासाठी यापुढेही भरघोस निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संपन्न झाला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, सचिन वालावलकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, सदानंद राणे, मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, प्रथमेश सावंत आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, तत्कालीन मंत्री भाईसाहेब सावंत यांच्यापासून ते माजी पालकमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर यांच्यासह सावंतवाडी पंचायत समितीच्या तत्कालीन सर्व सभापती उपसभापती व पदाधिकाऱ्यांनी या इमारतीसाठी मोठा पाठपुरावा केला. पूर्वी अडीच कोटींचे असलेले बजेट आता १४.६५ कोटींवर पोहोचले आहे. या आराखड्यात फर्निचरचा समावेश नसल्याची बाब आमदार केसरकर यांनी निदर्शनास आणून दिली असून, त्याचा प्रस्ताव पाठवल्यास तोही तातडीने मंजूर केला जाईल, जेणेकरून काम कोठेही थांबणार नाही.

२४ महिन्यांपैकी एक महिना उलटला असून आता उर्वरीत २३ महिन्यांत ही वास्तू दिमाखात उभी राहावी आणि तिच्या उद्घाटनाला खासदार नारायण राणे यांना आपण निमंत्रित करू असे ते म्हणाले. जिल्ह्यात सध्या दुष्काळाचे सावट असून प्रशासन 'ट्रिगर वन' अंतर्गत काम करत आहे, अशा वेळी पंचायत समितीची यंत्रणा बळकट होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

मी आमदार असताना व सत्तेत नसताना आम्हाला निधीसाठी मोठ्या प्रमाणात डावलले गेले होते. अनेक कार्यक्रमांना निमंत्रणही दिले जात नव्हते. मात्र, मी पालकमंत्री असताना अजिबात तसे होऊ देणार नाही. आमचे नेते खासदार नारायण राणे यांची आम्हाला तशी शिकवण नाही. उलट सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमची संस्कृती आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. मात्र, आपल्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमंत्रण पत्रिकेतील प्रोटोकॉलसारख्या किरकोळ बाबींवरून विरोधकांना 'फुलटॉस' देऊ नये, काही त्रुटी असल्यास आपसात चर्चा करून सोडवाव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.

सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांत मोठी गुंतवणूक येत आहे. अशावेळी कायद्याच्या चौकटीत व नियमानुसार जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. आपले स्थानिक व्यावसायिक कर्जाची मागणीच लाखांमध्ये करतात मात्र बाहेरून येणारे व्यावसायिक जर कोट्यावधींची गुंतवणूक आपल्या जिल्ह्यात करत असतील तर येथे रोजगार उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील. त्यामुळे केवळ राजकारणासाठी विरोध करून विकासाच्या आड येऊ नका असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. या भागात  रोजगार आणण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी  दिली. 

माजी मंत्री, आम. जयंत पाटलांना इशारा

जिल्ह्यात बाहेरून येऊन विकासप्रकल्पांना विरोध करण्यासाठी सांगलीवरून काही 'पार्सल' आंबोलीत येऊन थांबतात आणि येथील जमिनींवर लक्ष ठेवून विकासाला ब्रेक लावण्याचे काम करतात. जयंत पाटील यांच्या सांगलीतील काही लोकांनी येथील काजू बागायतदारांची फसवणूक करून त्यांची सबसिडी लाटली आहे. या सर्व बाबींचा हिशोब येत्या ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मी, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे नक्कीच चुकता करू, असा इशारा त्यांनी दिला.

आराखड्यात बदल न करता काम वेळेत पूर्ण करा : आ. दीपक केसरकर

दरम्यान, एखादा आराखडा मंजूर झाल्यानंतर त्यात वारंवार बदल करू नयेत, अन्यथा वाढीव निधीच्या मंजुरीअभावी काम रेंगाळते. सावंतवाडी पंचायत समितीचे काम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असून विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच ही इमारत पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे. उर्वरीत इमारतींची कामेही जिल्हा नियोजनमधून मार्गी लावली जातील. खासदार नारायण राणे यांचे या मतदारसंघावर नेहमीच प्रेम राहिले असून पालकमंत्री नितेश राणे हे देखील अत्यंत सकारात्मकतेने काम करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

प्रास्ताविकात सभापती सुस्मिता जाधव यांनी या इमारतीच्या प्रवासाचा इतिहास मांडला. ही इमारत म्हणजे केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्याची जागा नसून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणारे केंद्र ठरेल आणि येथूनच तालुक्याच्या प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी १४ कोटींचा भरघोस निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री व स्थानिक आमदारांचे आभार मानत या इमारतीतून विकासाची गंगा प्रवाहित होईल, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी पंचायत समिती ही प्रशासन आणि लाभार्थी यांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे आभार गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी मानले.