LIVE UPDATES

Sindhudurg Water Shortage : पाऊस ५ हजार मिमी, तरी पाणीटंचाई; जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

सिंधुदुर्गातील जलसंवादात पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन; १० हजार वनराई बंधाऱ्यांच्या लोकचळवळीचे कौतुक
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 20, 2026 05:59 PM
views 73  views
Guardian Minister Nitesh Rane addresses the Jal Samvad programme on water conservation and water management in Sindhudurg.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पाऊस पडत असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यात आणि त्याचे योग्य नियोजन करण्यात आपण कमी पडत आहोत. त्यामुळे पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याचा प्रभावी विनियोग यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल संवाद – उदक चालवावे युक्ती...’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा बँक उपाध्यक्ष तथा सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे अतुल काळसेकर,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कृषी बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे,आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात पाऊस मुबलक पडत असतानाही सिंधुदुर्गला दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये समाविष्ट व्हावे लागणे ही चिंतेची बाब आहे. यावरून पाणी नियोजनात कुठेतरी आपण कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. पावसाचे पाणी साठवणे, तलावांमधील गाळ काढणे, शहरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे अशा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम कोकणावरही झाला असून, निसर्गनिर्मित संकटांबरोबरच मानवनिर्मित संकटे टाळण्यासाठी आपण सजग राहिले पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प प्रशासनाने केला असून, या उपक्रमाला नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, वकील संघटना आणि पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्यात सिंधुदुर्गने राज्यात आघाडी घेतली असून, जिल्ह्यातील जनतेने जलसंधारणाच्या कामात दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. गावागावांतून उभ्या राहिलेल्या या चळवळीने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर असून नागरिकांनी चिंता करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. चारा टंचाईच्या संभाव्य परिस्थितीवरही प्रशासन नियोजन करत आहे. जिल्ह्यात उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेऊन अतिरिक्त चाऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सिंधुदुर्गातील अतिरिक्त चारा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांना पाठवून मदत करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी संबंधित यंत्रणांकडून अभ्यास व अहवाल घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तलावांमधील गाळ काढल्यास पाणीसाठवण क्षमता वाढू शकते. अनेक वर्षांपासून गाळ न काढलेल्या तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि प्रशासनाने समन्वय साधून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.

नळदेवेलसारखे महत्त्वाचे जलप्रकल्प अंतिम टप्प्यात असून, घळभरणीचा कार्यक्रम लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच तिलारी परिसरातील प्रकल्पांचे पाणी पाइपलाइनद्वारे आसपासच्या तालुक्यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. नळदेवेल प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कणकवलीपासून मालवणपर्यंत पाण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो, असे राणे यांनी नमूद केले.

राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. संकटाच्या काळात जनतेमध्ये भीती अथवा निराशा निर्माण करण्याऐवजी सकारात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. जलसंवादासारख्या कार्यक्रमातून तज्ज्ञांचे विचार, अनुभव आणि उपाय जनतेपर्यंत पोहोचतील. भविष्यातही अशा संवादातून जलसंधारणाच्या प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.