
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि जिल्ह्यातील युवक-युवतींनी प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर झेप घ्यावी, या उद्देशाने आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने व काका कुडाळकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) पूर्व परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अत्यंत कमी वेळेत निरोप देऊनही जिल्ह्यातील १७० विद्यार्थ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जि. प. सदस्य रूपेश कानडे, दीपक नारकर, दीपलक्ष्मी पडते, कुडाळ सभापती मिलिंद नाईक, नागेश आईर, काका कुडाळकर, दिनेश साळगावकर, विनायक राणे, अरविंद करलकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून रूपेश पाटील आणि महेंद्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना आमदार निलेश राणे म्हणाले की, "२००९ पासून प्रशासनात काम करताना जिल्ह्यात सर्व मोठे अधिकारी हे बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील असल्याचे पाहायला मिळाले. आपल्या जिल्ह्यातील मुले कलेक्टर, आयपीएस अधिकारी व्हावीत ही आमची आधीपासूनची इच्छा आहे. काका कुडाळकर यांनी लोकसेवा आयोगाच्या पदांच्या भरतीची माहिती ग्रुपवर पाठवली आणि त्यातूनच या कार्यशाळेची संकल्पना पुढे आली. २७ तारखेच्या अंतिम मुदतीपूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी तातडीने हे शिबिर घेतले."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "चित्रपट पाहून अधिकारी होणे सोपे नाही, त्यासाठी अथक परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. निवडणूक हरतात, चित्रपट पडतात, पण प्रशासकीय अधिकारी हा कायम सेवेत असतो. बिहारसारख्या राज्यांतून मोठ्या प्रमाणात अधिकारी घडतात, तसेच सिंधुदुर्गातूनही घडले पाहिजेत. खासदार नारायण राणे यांचीही इच्छा आहे की केवळ एक सचिन तेंडुलकर होऊन चालणार नाही, तर अनेक सचिन तेंडुलकर घडले पाहिजेत."
"जिल्ह्यातील अधिकारी असेल तर त्याला आपल्या मातीची तळमळ असते. तळाशील गावातील एम. एस. ई. बी. च्या कामाची परवानगी केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे अडकली होती; तिथे आपल्या जिल्ह्यातील अधिकारी असता तर विकासाचा विचार प्राधान्याने झाला असता." लवकरच निवृत्त जिल्हाधिकारी व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा ऑनलाइन स्वरूपातही सुरू केली जाईल," असे सूतोवाचही त्यांनी केले.
पक्षभेद विसरून विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपक्रम : दत्ता सामंत
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले की, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोणताही पक्ष किंवा भेदभाव न पाहता केवळ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जिल्ह्यातील तरुण अधिकारी घडावेत या हेतूने हे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जात आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








