
चिपळूण : शहराच्या मध्यवर्ती भागातील मोक्याची खेंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी हाणून पाडला आहे. २०२४ पासून पटसंख्या शून्य झाल्याने बंद पडलेली आणि मूळ मालकामार्फत बिल्डरच्या ताब्यात जाण्याच्या उंबरठ्यावर असलेली ही शाळा २३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासह पुन्हा दिमाखात सुरू झाली आहे.
एकेकाळी सव्वातीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी, प्रशस्त पटांगण आणि झाडे ही शालेय समृद्धी होती. मात्र २०२४ पासून येथील पटसंख्या शून्यावर. पुढे ही शाळा सुरू होण्याची शक्यता नसल्याने प्रतिज्ञापत्र पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून न्यायालय सादर करण्यात आले. त्यानंतर शाळेची जागा मूळ मालकाला परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील ही मौल्यवान जागा मिळवण्यासाठी बिल्डरने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची संगणमत करून पटसंख्या शून्यावर आणण्याचा कट रचल्याची चर्चा सुरू आहे. प्रशासकीय राजवटीत हा कट यशस्वी होण्याच्या मार्गावर होता पण लोकप्रतिनिधींची सत्ता येता हे चित्र बदलले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात जि. प. चे शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी कार्यालयाची पाहणी केली. न्यायालयात शाळेची बाजू प्रभावीपणे मांडली गेली नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याशी संवाद साधून तातडीने उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या सूचना दिल्या. केवळ कायदेशीर बाबींवर न थांबता मूरकर यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीवर भर दिला. यामध्ये सीईओ, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्थायी समिती सदस्य यांची साथ मिळाली. सर्वांच्या सहकार्यातून शाळेचे मोडकळीस आलेले स्वच्छतागृह उभारण्यात आले आणि दोन सुसज्ज वर्गखोल्या सज्ज करण्यात आल्या.
भविष्यात आदर्श शाळा बनेल
"ही शाळा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सुरू झाली असून तिचे पुनरुज्जीवन केल्याचे मनापासून समाधान आहे. उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता, ही शाळा भविष्यात एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येईल. निर्णय आपल्या बाजूने होईल असा विश्वास आहे. या कार्यात पदाधिकारी, अधिकारी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे."
नंदकुमार मुरकर
जिल्हा परिषद शिक्षण सभापती
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








