
चेन्नई : तमिळनाडू सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बाळांसाठी विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘थायमामन थंगा मोथिरम’ या योजनेअंतर्गत पात्र बाळांना १ ग्रॅम वजनाची २२ कॅरेट सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल १,२८,४९९ सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. या अंगठ्यांच्या खरेदीसाठी सुमारे २२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अहवालानुसार, अंगठ्यांचा पुरवठा जॉयअलुक्कास आणि कल्याण ज्वेलर्स यांच्याकडून केला जाणार आहे. या योजनेचा उद्देश सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे आणि नवजात बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करणे हा आहे.दरम्यान, वर्षभरात सुमारे ४.४१ लाख अंगठ्या वितरित करण्याचे सरकारचे नियोजन असून, यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
तमिळनाडू सरकारच्या या निर्णयामुळे नवजात बाळांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच सोन्याच्या स्वरूपात खास भेट मिळणार आहे.













