
सावंतवाडी : मोती तलाव येथे शनिवारी १० वीत शिकणारी विद्यार्थीनी आणि एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणातील पोलिसांचा प्राथमिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमधून काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावीत शिकत असलेल्या लिशा गोसावीला रोहन गोसावी हा सतत त्रास देत असल्याने व सावंतवाडीतील झालेल्या वादानंतरच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले असून तपासानंतरच या घटनेमागचे कारण समोर येणार आहेत.
दहावीत शिकणारी १६ वर्षीय लिशा व २४ वर्षीय रोहन विजय गोसावी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून मैत्री होती. यंदा दहावीचे वर्ष असल्याने लिशाच्या पालकांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले होते. मात्र, रोहनकडून सतत फोन व मेसेजद्वारे होणाऱ्या त्रासाला कंटाळून लिशाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. याच रागातून रोहन शनिवारी मुंबईतील नालासोपारा येथून थेट सावंतवाडीत दाखल झाला. सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रीकरणानुसार, घटनेच्या दिवशी मोती तलावाकाठी असलेल्या बापूसाहेब महाराज पुतळ्याच्या मागे लिशा, रोहन आणि लिशाची चुलत बहीण खुशी गोसावी हे तिघे एकत्र आले होते. मोबाईल तपासण्यावरून जोरदार शाब्दिक बाचाबाची दोघांत झाली. यानंतर हा वाद अधिकच वाढत असल्याने खुशी कोणालातरी फोन करत असल्याचेही दिसत आहे. ती फोन करत असल्याचे पाहून दोघेही तिला थांबवून लिशाने मोबाईल बंद केला. त्यानंतर तिघेही तेथून निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, काही वेळातच याच भागात लिशाने रोहनला संपर्क न करण्याची ताकीद दिली आणि अचानक तलावात उडी घेतली. तिला वाचवण्यासाठी सोबत असलेल्या खुशीने आरडाओरडा केल्यावर रोहननेही क्षणाचा विचार न करता पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी खुशी गणपत गोसावी हिच्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलिसांनी दोन्ही मृत्यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर आणि पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे पुढील तपास करत आहेत. घटनेतील दोन्ही मृतांचे मोबाईल लॉक असल्याने वादाचे मुख्य कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हे मोबाईल उघडल्यानंतरच या प्रकरणातील खरा प्रकार उघडकीस येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.










