LIVE UPDATES

सिंधुदुर्गात ३५ वर्षांतील सर्वात कमी पाऊस

सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवींची माहिती ; भातशेती अजूनही सुरक्षित
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 10:34 AM
views 286  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केवळ १८२४.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या ३५ वर्षांतील ही सर्वात कमी नोंद ठरली आहे. कुडाळ येथील मुळदे कृषी हवामान वेधशाळेच्या १९९१ सालापासूनच्या नोंदींनुसार, यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल २९.१८ टक्के पावसाची तूट भासली आहे. पावसाच्या उत्तरार्धातही (ऑगस्ट-सप्टेंबर) ही घट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

​ मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९१ नंतरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार यंदा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे.

पाऊस उशिरा सुरू झाला तरी मध्ये मध्ये  पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे भातपिकाचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. उलट या हवामानामुळे भातशेतीला काही प्रमाणात पूरक वातावरण मिळाले आहे.

​भात पिकाची योग्य वाढ आणि उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी येत्या २० ते २५ दिवसांत दररोज २५ ते ३० मिमी पावसाची नितांत गरज आहे.

​कोकणात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्याने अल निनोचा तीव्र परिणाम जाणवलेला नाही. मात्र, पुढील वर्षाच्या परिस्थितीबाबत आताच अंदाज बांधणे कठीण असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

​हवामान अंदाजाबाबत बोलताना डॉ. दळवी यांनी सांगितले की, पावसाचा अचूक आणि अचूक अंदाज हा महिनाभर आधी निर्माण होणाऱ्या वातावरणीय घटकांवरूनच स्पष्टपणे मांडता येतो. सध्या शेतकरी वर्ग उत्तरार्धातील पावसाच्या प्रतीक्षेत आहे.