LIVE UPDATES

NICU fire in Amravati : अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात आग लागून ३ बालकांचा मृत्यू

Amravati hospital fire : सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 24, 2026 12:54 PM
views 88  views
Amravati hospital fire

अमरावती : येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या एनआयसीयू (NICU) विभागात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला असून कक्षात असलेल्या 6 अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. आग लागल्यानंतर तिथे धूर पसरला. त्यावेळी एनआयसीयूमध्ये ३९ नवजात बालके दाखल होती. आग लागताच डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले आणि अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयसीयूच्या तीन विभागांपैकी एका विभागात 9 नवजात बालके दाखल होती. त्यापैकी तिघे आगीच्या विळख्यात सापडून मरण पावले, तर उर्वरित सहा जणांना उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, एनआयसीयू मधील व्हेंटिलेटर युनिटमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. या घटनेच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या सचिवांना आज अमरावतीला भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मृत नवजात बालकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.