LIVE UPDATES

कणकवलीतील केळीच्या वखारीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड

केमिकलचा वापर करून फळे पिकवली जात असल्याच्या संशयावरून तपासणी; फळ विक्रेत्यांमध्ये खळबळ
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 24, 2026 09:45 AM
views 972  views

कणकवली : शहरातील केळी साठवणूक करणाऱ्या वखारींवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सकाळी 7:30 च्या सुमारास धाड टाकत तपासणी केली. केमिकलचा वापर करून केळी व इतर फळे पिकवली जात असल्याच्या संशयावरून ही तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सणासुदीच्या दिवसात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील केळी साठवणूक करणाऱ्या 2 वखारींची पाहणी करून फळांची साठवणूक, पिकविण्याची पद्धत तसेच संबंधित ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी केली. या कारवाईमुळे शहरातील फळ साठवणूक व विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

फळे नैसर्गिक पद्धतीने पिकवण्याऐवजी रासायनिक पदार्थांचा वापर करून पिकवली जात असल्यास त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना “जनतेच्या जीवाशी खेळलात तर कारवाई होणारच” असा इशारा दिला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईकडे विशेष लक्ष लागले आहे. या तपासणीत काही आक्षेपार्ह बाबी आढळल्या का आणि संबंधितांवर पुढील कारवाई काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.